अखेर भारतीय रेल्वेने जाहीर केल्यानुसार काल विशेष प्रवासी रेलगाड्या येथून सोडण्यात आल्या. एकूण २२९९ प्रवाशांसह दिल्ली रेल स्थानकावरून त्या रवाना झाल्या. प्रथम संध्याकाळी एक रेलगाडी नवी दिल्लीहून दिब्रुगड येथे रवाना झाली व ४.४५ वा. नवी दिल्लीहून बंगळुरू येथे दुसरी ट्रेन सोडण्यात आली.
नवी दिल्ली-विलासपूर विशेष ट्रेन १११७ प्रवाशांसह संध्या. ४ वा. सोडण्यात आली. तर ११२२ प्रवाशांसह दिल्ली-दिब्रुगड ट्रेन सोडण्यात आली. रात्री ९.१५ वा. सुटणार्या विशेष ट्रेनसाठी ११६२ प्रवाशांनी आरक्षण केले होते. विशेष ट्रेनची घोषणा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नवी दिल्लीहून ३४६१ प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे स्थानकावर येण्याआधीपासूनच सर्व तयारी पूर्ण केली होती. रेल्वे स्थानकावर प्रवेश करतेवेळी आरोग्य सेतू ऍप लोड केला आहे काय अशी विचारणा प्रवाशांना केली जात होती. बहुतेकांकडून त्यावर होकारार्थी उत्तर दिले गेले असे सूत्रांनी सांगितले. प्रवाशांनी प्रवेश फाटकावर हातावर सॅनिटायझरचा वापर केला. प्रत्येकाच्या चेहर्यावर मास्क होता व सामानही किरकोळ सोबत ठेवले होते.
प्रवाशांनी स्थानकावर प्रवेश केल्यानंतर अधिकार्यांनी त्यांना त्यांचा डबा कोठे आहे ते दाखविले. रेल्वे महामंडळाचे चेअरमन व्ही. के. यादव यावेळी स्थानकावर उपस्थित होते.
दरम्यान, मंगळवारी उशिरा अन्य ५ विशेष ट्रेन्स पाटणा, बंगळुरू, हावरा, मुंबई व अहमदाबाद येथून सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आज दि. १३ रोजी आठ रेलगाड्या दिल्लीहून हावरा, राजेंद्र नगर, जम्मू तावी, तिरुअनंतपूरम, चेन्नई, रांची, मुंबई सेंट्रल अहमदाबाद येथे निघणार आहेत.