दिल्ली-एनसीआर आणि उत्तरप्रदेशच्या काही भागात काल भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाची तीव्रता ही 5.6 रिश्टर स्केल इतकी होती. मागील तीन दिवसांमध्ये हा दुसरा भूकंप आहे. यापूर्वी, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचे केंद्रही नेपाळमध्ये होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.
राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. सोमवारी सायंकाळी 4 वाजून 16 मिनिटांनी नेपाळमध्ये 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नेपाळमध्ये केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे दिल्लीसह आसपासचा परिसर हादरला आहे.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. अवघ्या एक महिन्यात चौथ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या धक्क्यांमुळे कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या या भूकंपात 157 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.