>> पोलीसासह तीन ठार
>> अनेकजण जखमी
ईशान्य दिल्लीतील जाफ्राबाद व मौजपूर या भागांमध्ये काल पुन्हा सीएएविरोधक व सीएएसमर्थक निदर्शकांदरम्यान जोरदार संघर्ष उडाला. परिणामस्वरुप निदर्शकांनी घरे, दुकाने तसेच वाहनांची जाळपोळ केली व परस्परांवर तुफान दगडफेक करून हिंसाचार माजवला. या हिंसाचारात एक पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला. तसेच दोन नागरिकही हिंसाचारात मरण पावले आहेत. तर पोलीस उपायुक्त जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर पोलीसांच्या लाठीमारात निदर्शकही जखमी झाले. दिल्लीच्या चॉंदबाग व भजनपुरा या भागांमध्येही बर्याच हिंसाचाराच्या घटना घडल्या.
निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रुधाराचा वापर केला. तसेच लाठीमारही केला. हिंसाचारादरम्यान रतनलाल नामक कॉन्स्टेबल मृत्यूमुखी पडला. तसेच पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, काल सकाळी जखमी झालेल्या निदर्शकाचे उपचारांदरम्यान निधन झाले.
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित भागामध्ये १४४ कलम लागू करण्यात आले. मौजपुरमध्ये निदर्शकांनी तुफान दगडफेक केली. जाफ्राबादमध्ये पोलीसांनी निदर्शकांवर लाठीमार केला. मौजपूर व भजनपुरा येथे निदर्शकांनी दुकाने व घरांची नासधुस केली.
एक निदर्शक पिस्तुल हातात घेऊन दिल्ली पोलिसांच्या दिशेने गेला व त्याने हवेत गोळीबारही केला.
कायदा सुव्यवस्थेसाठी केंद्राने पावले
उचलावीत ः केजरीवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच्या हिंसाचारामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत असे आवाहन केले. दरम्यान नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांना स्थितीवर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले. दिल्लीत मोठा हिंसाचार झाल्याच्या वृत्ताने वेदना झाल्या. माझे माननीय नायब राज्यपाल व केंद्रीय गृह मंत्र्यांना आवाहन आहे की दिल्लीतील शांतता व सलोखा सुस्थितीत आणण्यासाठी त्यांनी खबरदारी घ्यावी, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, बाबरपूरचे आमदार तथा दिल्लीचे मंत्री गोपाळ राय यांनीही नागरिकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. रविवारीही वरील ठिकाणी सीएए विरोधक व समर्थक यांच्यात संघर्ष उडाला होता. भाजप नेते कपिल शर्मा यांनी एक रॅली काढून तेथे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वातावरण चिघळले होते.