दिल्लीत यमुना नदीच्या स्वच्छतेस सुरूवात

0
4

>> नवे सरकार स्थापन होण्यापूर्वीच काम सुरू

>> भाजप विधिमंडळ पक्षाची आज बैठक

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सत्तेवर येताच यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता दिल्लीत भाजपची सत्ता आली असली तरी अजून नवीन सरकारची स्थापना झालेली नाही मात्र तरीही यमुना नदीच्या स्वच्छतेच्या कामाला सुरूवात झालेली आहे. यमुना नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी दिल्ली सरकारच्या पूर आणि पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी नवीन चौधरी यांना देण्यात आली आहे. उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या सूचनेनुसार मोठमोठ्या मशीन्सद्वारे ही स्वच्छता करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी यमुना नदीच्या स्वच्छतेच्या प्रश्नावरून भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. नवे सरकार स्थापन होण्याआधीच यमुनेच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू झाले असून अत्याधुनिक यंत्रे, मशीन्सद्वारे यंत्रणा कामाला लागली आहे. यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी 7 आधुनिक यंत्रांद्वारे मोहीम राबवण्यात येत आहे. यात 4 स्किमर मशीन, 2 वीड हार्वेस्टिंग मशीन आणि एक डीटीयू मशीन आहे.

या मोहिमेद्वारे दोन प्रकारचे कृती आराखडे तयार केले असून त्यातील पहिल्या कृती आराखड्याचे काम काल रविवारी सुरू झाले आहे. त्याअंतर्गत सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. यमुनेत किती कचरा पसरला आहे, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित आकडेवारी नाही. त्यामुळे या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किती वेळ लागेल, हे काम सुरू झाल्यानंतरच कळेल. यमुना नदीचे कचऱ्यामुळे नाल्यात रुपांतर झाले आहे.

विधिमंडळ पक्षाची
आज होणार बैठक
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव आज सोमवारी निश्चित केले जाणार आहे. आज दुपारी भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे.
70 पैकी 48 जागा जिंकून भाजप 26 वर्षांनी सत्तेत परतत आहे. नवीन सरकार 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी शपथ घेऊ शकते. भाजपने 71% जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले आहे. तर दिल्लीत दोनदा 60 पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या ‘आप’ला यावेळी 22 जागांवर घसरण झाली आहे. तर काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही.

शपथविधी समारंभ एखाद्या भव्य कार्यक्रमासारखा असू शकतो. पंतप्रधानांव्यतिरिक्त, त्यात वरिष्ठ मंत्रिमंडळ आणि पक्षाचे नेते असतील. याशिवाय, भाजप आणि एनडीएशासित 21 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील येण्याची शक्यता आहे.

शर्यतीत 6 नावे
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 6 आमदारांची नावे आघाडीवर आहेत. पक्षाने 15 आमदारांची नावे जाहीर केली आहेत. दिल्ली मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 7 मंत्री असू शकतात.