>> देशातील रुग्णांची संख्या झाली पाच
दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला असून भारतातील मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. केरळमध्ये तीन जणांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याचवेळी तेलंगणामध्ये एका संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्याचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
दिल्लीत आढळलेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णाच्या विदेश प्रवासाची नोंद सापडली आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी तेलंगणात आढळून आलेला संशयित रुग्ण नुकताच कुवेतला गेला होता. २० जुलै रोजी त्याला ताप आला आणि अंगावर पुरळ उठले. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पुण्यातील नमुन्याचा निकाल येणे बाकी आहे.
देशात पाच रुग्ण
भारतात आतापर्यंत पाच रुग्णांना मंकीपॉक्स विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीत नव्याने आढळेल्या रुग्णाआधी भारतात चार रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी आढळलेले मंकीपॉक्सचे तीनही रुग्ण केरळमधील आहेत. या बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लस बनवण्यासाठी भारताच्या हालचाली
मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र सरकारकडून या रोगावर लस बनवण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारने यासाठी निविदा काढली आहे. मंकीपॉक्सवर लस निर्मिती करण्याची तयारी दाखवणार्या किंवा संशोधन करणार्या किटसाठी ही निविदा आहे. इच्छुक कंपन्या आपली दावेदारी १० ऑगस्टपर्यंत दाखल करू शकणार आहेत.
७८ देशांत फैलाव
जगातील एकूण ७८ देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातील ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण युरोपीयन देशांमधील आहेत. तर २५ टक्के रुग्ण अमेरिका खंडातील आहेत.