
सर्वोच्च न्यायालयाने काल एका निवाड्याद्वारे येत्या दिवाळीत दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी कायम केली. यासंबंधी ११ नोव्हेंबर २०१६मध्ये घाऊक व किरकोळ फटाके विक्री परवान्यांवरील निलंबनाचा आदेश देण्यात आला होता. तो आदेश काल न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने उचलून धरीत दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी जाहीर केली. या बंदीचा कालावधी १ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. या व्यवसायातील सर्व संबंधितांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
गेल्या १२ सप्टेंबर रोजी न्या. बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी फटाके विक्रीवरील बंदी अंशत: उठवली होती. नोव्हेंबर २०१६ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात किंचित दुरुस्ती करून द्विसदस्यीय खंडपीठाने कायम परवाना असलेल्या व्यापार्यांना दिलासा दिला होता. ज्या विक्रेत्यांना फटको विक्रीचे तात्पुरते परवाने देण्यात आले होते ते परवाने तातडीने निलंबित करावेत असेही काल न्यायालयाने आपल्या निवाड्यात स्पष्ट केले आहे.
२००५ सालीही सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मोठा आवाज करणारे फटाके लावण्यावर पूर्णबंदी घालण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने गेल्या वर्षी दिल्लीतील दिवाळी सणानंतरच्या हवा प्रदुषण पातळीचा संदर्भ घेत निरीक्षण नोंदवले की प्रचंड प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जात असल्याने दिल्ली प्रदेशातील हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते व शहराची अवस्था बिकट बनते.