दिल्ली-एनसीआरमध्ये काल जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवारी सकाळी दिल्लीत तीन तासांत सुमारे 3 इंच पाऊस पडला. जोरदार वाऱ्यामुळे विमानांना उड्डाण करण्यात अडचणी आल्या, तर 200 हून अधिक उड्डाणे उशिराने झाली. तसेच दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 चे टिन शेड देखील कोसळले. लुटियन्स परिसरात 25 हून अधिक झाडे पडली. झाड पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर दिल्लीच्या जाफरपूर कलान परिसरात पावसामुळे घर कोसळून मातेसह तीन मुलांचा मृत्यू झाला.
हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी दिल्लीत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच दिल्ली-एनसीआरच्या काही भागात 70-80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि मध्यम ते जोरदार वादळे येतील, असा अंदाज वर्तवला होता. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत, तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यातून वाट काढताना नागरिक व वाहनचालकांची धांदल उडाली.
दिल्लीतील जाफरपूर कलान परिसरात जोरदार वाऱ्यांमुळे मोठी दुर्घटना घडली. शेतात बांधलेल्या घरावर एक मोठे कडुलिंबाचे झाड कोसळले. त्यामुळे घरातील एक महिला आणि तीन मुलांचा ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोहोचलेल्या मदत आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढले; परंतु रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत एक जण जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक फ्लाइट्सच्या उड्डाणांवर परिणाम झाला. 40 हून अधिक विमानांची दिशा बदलण्यात आली, तर 200 हून अधिक विमानांना उशीर झाला. शनिवारी देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा विमानसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेश, छत्तीसगडमध्येही पावसाचे बळी
गुरुवारी रात्री उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. त्यादरम्यान वीज पडण्याच्या घटनांमध्ये उत्तरप्रदेशात 4 आणि छत्तीसगडमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला.