>> ‘यूएपीए’ आणि दहशतवादविरोधी कायद्याखाली कारवाई
>> 35 ठिकाणे छापे; 500 पोलीस अन् 25 प्रश्नांची सरबत्ती
दहशतवादविरोधी कायदा आणि देशविघातक कृत्ये प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये एकूण 35 ठिकाणी काल छापे टाकले. त्यापैकी 8 ते 9 छापे पत्रकारांच्या घरात टाकण्यात आले. हे पत्रकार ‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित होते. या छापेमारीनंतर काल रात्री उशिरा न्यूजक्लिकचे मुख्य संपादक व संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली. चीनकडून मिळालेला बेकायदेशीर निधी आणि त्यातून काही देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली.
न्यूजक्लिकविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. एखाद्या वृत्तसंकेतस्थळाविरोधात दहशतवादी कारवायांच्या नावाखाली गुन्हा दाखल होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकवर यूएपीएच्या कलमांखाली भादंसंच्या 153 अ (दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), 120 ब (गुन्हेगारी कट) गुन्हे दाखल केले आहेत. या संस्थेला चीनकडून निधी मिळाल्याच्या आरोपांमुळे ही संस्था दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि अंमलबजावणी संचालनालया (ईडी) च्या रडारवर आहे. हा निधी बेकायदेशीररीत्या प्राप्त झाला असून, त्याची कागदपत्रे अधिकाऱ्यांना देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीच्या तपासात तीन वर्षांच्या अल्प कालावधीत 38.05 कोटी रुपयांच्या विदेशी निधी या वृत्तसंकेतस्थळाला मिळाल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली पोलिसांच्या या कारवाईत 500 पोलीस सहभागी झाले होते. त्यांनी दिल्लीतील वेगवेगळ्या 35 ठिकाणी छापे टाकले. काहींना लोधी रोड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलावण्यात आले, तर काहींची घरातच चौकशी करण्यात आली आहे. जे 25 प्रश्न चौकशीवेळी विचारण्यात आले. त्यात शेतकरी आंदोलन, शाहीनबाग आंदोलन, ईशान्येतल्या आंदोलनाबाबतचेही प्रश्न होते. या छाप्यादरम्यान, दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांशी घरातून लॅपटॉप, मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले असून, हार्ड डिस्कचा डेटाही ताब्यात घेतला आहे.
न्यूजक्लिकचे मुख्य संपादक व संस्थापक प्रबीर पुरकायस्थ, पत्रकार अभिसार शर्मा, भाषा सिंह, उर्मिलेश, सोहेल हाश्मी, परणजॉय गुहा ठाकुर्ता, गीता हरिहरन, आनिंदो चक्रवर्ती, संजय राजौरा यांच्यासह अन्य काही पत्रकार आणि ‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित व्यक्तींवर छापेमारी केली. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मुंबईत देखील छापेमारी केली. तिस्ता सेटलवाड यांच्या घरात छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली.