दिल्लीत इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट

0
222

राजधानी दिल्लीत शुक्रवारी सायंकाळी इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला. इस्रायली दूतावासापासून जवळपास जवळपास १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. या स्फोटामुळे काही गाड्यांचे नुकसान झाले आहे मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुणीही जखमी झालेले नाही. जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपांत आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचे उघड झाले आहे. ‘आयईडी’च्या माध्यमातून हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचे प्राथमिकदृष्ट्‌या दिसून आले आहे. स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू होता. या स्फोटाची तीव्रता कमी असून इस्रायली दूतावासाच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत.

हरयाणा, उत्तरप्रदेशात तणाव वाढला
दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर हरयाणा आणि उत्तर प्रदेश सीमेवर तणाव वाढत आहे. सिंघू सीमेवर हरयाणा सरकारने शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १४ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवेवर बंदी घातली आहे. अफवा रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सिंघू सीमेवर राहणारे स्थानिक दोन दिवस आंदोलकांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकर्‍यांना तेथून त्वरित हलवावे अशी मागणी हे नागरिक पोलिसांकडे करत आहेत.

पोलिसांवर आंदोलकांचा हल्ला
या मागणीनुसार पोलिसांनी शेतकर्‍यांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परिस्थिती तणावाची बनली. शेतकर्‍यांनी पोलिसांवर हल्ला केला. लाठ्या काठ्यांनी हल्ला करत आणि दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला व जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

शेतकर्‍याचा तलवारीने वार
सिंघू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमधील संघर्षात शेतकर्‍याने पोलिसांवर तलवारीने हल्ला केला. यात दिल्ली पोलिसांमधील एक पोलीस जखमी झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी शेतकर्‍याला पकडून त्याच्यावर लाठीमार केला.