दिल्लीतील बैठकीचे गूढ अजूनही कायम

0
3

प्रदेशाध्यक्ष म्हणतात, ‘त्या’ दोघांनाच विचारा

वी दिल्ली येथे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीतील चर्चेची मला काहीच माहिती नाही. तुम्ही त्या दोघांकडे बैठकीतील चर्चेबाबत विचारणा केली पाहिजे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नवी दिल्ली येथील मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्य मंत्री राणे यांच्यातील बैठकीबाबत त्या दोघांकडून काहीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे बैठकीतील चर्चेचे गूढ कायम आहे. या बैठकीतील चर्चेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सदानंद तानावडे यांच्याकडे संयुक्त बैठकीतील चर्चेबाबत विचारणा केली असता, तुम्ही त्या दोघांकडे विचारणा केली पाहिजे, असे तानावडे यांनी सांगितले.

सरकार स्थिर : विश्वजीत राणे
राज्यातील भाजपचे सरकार स्थिर आहे. दिल्लीतील बैठकीत राज्यातील पक्षसंघटना मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. आपण आणि मुख्यमंत्री दोघेही ज्येष्ठ नेते असल्याने राज्यात भाजपचे पक्षसंघटन आणखी बळकट करणे, भाजप सदस्य नोंदणी वाढविणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असेही राणे यांनी सांगितले.