नवी दिल्ली येथील धान्य बाजार परिसरात असलेल्या कारखान्यांना काल रविवारी पहाटे आग लागून या आगीत आत्तापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत अनेकजण जखमी झाले असून जखमींना त्वरित एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळाले असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे.
दिल्लीतील धान्य बाजार परिसरात काल रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत ही आग विझवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पहाटे लागलेली ही आग आता पूर्णपणे विझली असल्याची माहिती दिल्ली उप अग्निशामक दल प्रमुख सुनील चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बचावकार्य सुरू असून या कामाला ३० अग्निशमन दलाचे बंब कार्यरत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जवळपास ५० लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढले. आग आटोक्यात आली असली तरी इमारतीच्या खिडक्यांमधून काळा धूर निघत आहे. यामुळे आत आग धुमसत असल्याचे सांगितले जात असून आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
मृतांना आर्थिक मदत
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाच्यावतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख रुपये तर गंभीर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे.
पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपतींकडून शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत दिल्लीच्या धान्यबाजारात लागलेल्या आगीची दुखद बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. बाधित कुटुंबांसाठी मी प्रार्थना करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या भीषण घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना ही आगीची घटना अत्यंत भीतीदायक आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. प्राधिकरण घटनास्थळावर सर्व शक्य सहाय्य करीत आहे, असे पंतप्रधांनी म्हटले आहे.