केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल देशाच्या राजधानीतील हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर सदर भागांतील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले. सर्व भागांमध्ये पोलीस आपले काम बजावित आहेत असे ते म्हणाले. त्यांनी सदर भागांतील नागरिकांशी संवादही साधला. दरम्यान, गेल्या रविवारपासूनच्या हिंसाचारातील मृतांची संख्या २४ वर गेली असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत.
दरम्यान, दिल्लीत काल सीआरपीएफच्या ४५ पलटणी तैनात केल्यानंतर स्थिती शांततापूर्ण झाली असली तरी कालही काही दुकाने जाळण्यात आली. तसेच गुप्तचर खात्याचा एक कर्मचारीही मृतावस्थेत सापडला.
जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, यमुना विहार, भजनपुरा, चांद बाग, शिव विहार या भागांमध्ये प्रामुख्याने मोठा हिंसाचार, जाळपोळ, नासधूस असे प्रकार घडले आहेत.
पाहणीआधी डोवाल यांनी दिल्ली पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत सीलमपूर येथे बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त (क्राईम) मनदीप सिंग रंधावा, विशेष पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव व सतीश गोलचा, पोलीस उपायुक्त वेद प्रकाश आर्य आदी उपस्थित होते.
डोवाल यांच्याकडे अनेकांनी
केल्या पोलिसांबाबत तक्रारी
हिंसाचारग्रस्त भागात पाहणी करताना अनेक नागरिकांनी डोवाल यांच्याकडे हिंसाचाराबाबत नाराजी व्यक्त करणार्या तक्रारी केल्या. एका युवतीने त्यांच्याशी संवाद साधताना सध्या आपणास सुरक्षित वाटत नसल्याचे त्यांना सांगितले. हिंसाचार सुरू असताना पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचे युवतीने त्यांना सांगितले. त्यावर डोवाल यांनी तिला प्रत्येकजण येथे सुरक्षित आहे हा आपला शब्द आहे असे सांगितले. तसेच सदर युवतीला सुरक्षित घरी पोचवण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले.
शांतता पाळण्याचे
पंतप्रधानांचे आवाहन
दिल्लीतील हिंसाचारात बळींची संख्या चौथ्या दिवशी २४ वर गेल्याच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत शांततेसाठी नागरिकांनी ट्विटद्वारे आवाहन केले. राजधानीतील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठका घेतल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. दिल्लीत शक्य तेवढ्या लवकर स्थिती सर्वसामान्य होण्यासाठी सर्व नागरिकांनी शांतता पाळावी असे आवाहन त्यांनी केले.