दिल्लीतील चेंगराचेंगरीला रेल्वेची ‘ती’ घोषणा कारणीभूत

0
3

>> प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेलगांड्यामुळे प्रवाशांत गोंधळ

नवी दिल्ली येथील रेल्वेस्थानकावर शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. मात्र ही घटना रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेच्या गोंधळामुळे घडल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. या घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असला तरी मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मृतांमध्ये 14 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

घोषणेमुळे गोंधळ
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी महत्त्वाची माहिती देताना एकाच नावच्या दोन रेलगाड्यांच्याॉनावामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रयागराज नावाच्या दोन ट्रेन होत्या. एक प्रयागराज एक्सप्रेस आणि दुसरी प्रयागराज स्पेशल. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्र. 16 वर येण्याच्या घोषणेमुळे गोंधळ निर्माण झाला. कारण प्रयागराज एक्सप्रेस अगोदरच प्लॅटफॉर्म क्र. 14 वर उभी होती. ज्यांना त्यांच्या ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म 14 वर पोहोचता आले नाही त्यांना त्यांची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वर येत आहे असे वाटले. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली.
प्रयागराजकडे जाणाऱ्या चार ट्रेन होत्या, त्यापैकी तीन ट्रेन उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वेस्थानकावर खूपच गर्दी झाली. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे असे पोलिसांनी सांगितले.

शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास दिल्ली रेल्वे स्थानकावर अचानक गडबड गोंधळ झाला. या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस आणि मगध एक्सप्रेस रेल्वेने जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी जमा झाली होती. या दरम्यान, अचानक रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली. प्रत्येकाला ट्रेनमध्ये जागा हवी होती. रेल्वे पकडण्यासाठी गर्दी इतकी होती की तिकीट असणाऱ्यांना देखील जागा मिळाली नाही. यामुळेच चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या दोन गाड्या उशिराने गेल्याने स्थानकावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. हे लोक ट्रेनची वाट पाहत होते. दरम्यान, अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा झाल्याने लोक एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर धावू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
केला शोक व्यक्त

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ख् राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
ख् रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावर या चेंगराचेंगरीमुळे मोठा धक्का बसला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. संपूर्ण टीम अपघातग्रस्त लोकांना मदत करत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

10 लाखांची भरपाई
या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.