दिल्लीतील गुन्हेगारांना गोव्यात अटक

0
95

>> पोलिसांच्या खुनाचा केला होता प्रयत्न

दिल्ली येथे नाकाबंदीवेळी कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचार्‍यांवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना कळंगुट पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी, उपअधीक्षक किरण पौडवाल आणि निरीक्षक जीवबा दळवी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे दि. ११ जानेवारी रोजी दिल्ली येथे नियमित होणार्‍या नाकाबंदीत तिघांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर गोळीबार करून ते फरार झाले होते. त्यांची नावे विपीन सुनील डागर (२४-दिल्ली), प्रवीण सुर्जय डागर (२३-दिल्ली) आणि अजय कुमार कृष्णलाल अहलावत (२२-हरयाणा) अशी आहेत. सदर संशयित आरोपी पलायन करून गोव्यात आले होते. कळंगुट येथील एका वाईन शॉपमध्ये मद्य खरेदी करण्यासाठी आला आणि त्याने आपल्याकडील एटीएम कार्ड स्वाईप करून रक्कम अदा केली होती. सदर माहिती गोवा पोलिसांना दिल्ली पोलिसांनी त्याचवेळी कळविली असता अधीक्षक चौधरी यांनी कळंगुट पोलीस चौकीचे निरीक्षक जीवबा दळवी यांना कळविले.

उशीर न करता त्या वाईनशॉपवर तब्बल दीडतास देखरेख करून तिघांपैकी एकटा पुन्हा मद्य खरेदी करण्यासाठी आला असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर त्याने दाखविलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बसलेल्या इतर दोघांना ताब्यात घेतले. रात्री ८ वाजता अधीक्षक चौधरी यांना दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपी कळंगुटमध्ये असल्याचे कळविले आणि ११.१५ वाजता त्यांना शिताफीने अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे इतर चार मित्र होते. परंतु गुन्हा करणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी इतरांना जाऊ दिले.

भा.दं.सं. २५,२७,५४,५९ आणि १८६,३५३,३०७ (३४) गुन्हा नोंदविण्यात आले आहे. यावेळी निरीक्षक जीवबा दळवी यांच्यासह उपनिरीक्षक सीताराम मळीक, कीर्तिदास गावडे, हवालदार संज्योत केरकर, समीर नाईक, विजय पिरणकर यांनी कारवाई केली. यातील एक संशयित आरोपी प्रवीण डागरवर जम्मू काश्मीर येथील पोलीस स्थानकावर गुन्हा नोंदविण्यात असून उत्तराखंडमधील विशेष पोलीस पथकाने अटक केली होती. आरोपीना लवकरच दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.