भाजप आमदार रेखा गुप्ता यांनी काल दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आणि भाजपकडून पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी संपन्न झाला. रेखा गुप्तांसह उपमुख्यमंत्री पर्वेश शर्मा आणि 6 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
दिल्लीतील रामलीला मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थिती होते.
दिल्ली विधानसभेत 27 वर्षानंतर सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळाले आहे. यापूर्वी, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी सुषमा स्वराज, शीला दीक्षित, आतिशी यांनी महिला म्हणून कार्यभार सांभाळला होता. आता, रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, शालिमार विधानसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. आम आदमी पक्षाच्या तीनवेळा आमदार राहिलेल्या बंदना कुमारी यांचा पराभव करत त्या दिल्लीच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्या आहेत.
निकाल जाहीर झाल्यानंतर जवळपास 10 दिवस भाजपला दिल्लीचा मुख्यमंत्री निवडता आला नव्हता. पद एक, दावेदार अनेक यामुळे दिल्लीतील मुख्यमंत्रिपदाची माळ नेमके कोणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. भाजपने दिल्लीसाठी देखील धक्कातंत्र वापरत बुधवारी रेखा गुप्ता यांना भाजप आमदारांचा गटनेता म्हणून घोषित केले होते. त्यानंतर काल सकाळी त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. रेखा गुप्ता ह्या भाजप व संघ परिवाराशी जोडल्या असून, सध्या भाजपच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. त्यामुळेच, भाजपने पहिल्यांदाच आमदार बनलेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी सोपवली आहे.
रेखा गुप्ता यांच्यासह उपमुख्यमंत्री पर्वेश शर्मा व 5 आमदारांनी दिल्लीच्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आशिष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रवींद्र कुमार इंद्रराज, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंह या आमदारांनी दिल्लीच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर पुढील 4 तासांत मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले.
कोणाकडे कुठली खाती?
रेखा गुप्ता : गृह, वित्त, सेवा, दक्षता, नियोजन
पर्वेश शर्मा : शिक्षण, सार्वजनिक बांधकाम खाते व परिवहन
मनजिंदर सिंग : आरोग्य, उद्योग व नगरविकास रवींद्र कुमार : समाज कल्याण आणि कामगार
कपिल मिश्रा : जल, पर्यटन व संस्कृती
पंकज कुमार सिंह : कायदा व गृहनिर्माण
आशिष सूद : महसूल, पर्यावरण व अन्न-नागरी पुरवठा