दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आतिशी मार्लेना यांना संधी

0
6

>> आम आदमी पक्षाकडून एकमताने निवड; केजरीवालांकडून उपराज्यपालांकडे राजीनामा सादर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांची नावेही चर्चेत होती. मात्र, अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पक्षाने एकमताने निवड केली. या निवडीनंतर अरविंद केजरीवाल यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यपालांकडे सुपूर्द केला.

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आतिशी यांचे नाव दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री सुचवले. केजरीवाल यांनी मंगळवारी आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, त्याला आमदारांनी सहमती दर्शवली. त्यानंतर आतिशी मार्लेना ह्या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करण्यात आली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी संध्याकाळी 4.45 वाजता उपराज्यपाल विनय सक्सेना यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. आतिशी यांच्यासह सर्व मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित होते. दिल्ली सरकारने 26 आणि 27 सप्टेंबरला विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलावले आहे.