‘दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा मला प्रस्ताव होता’

0
90

कुमार विश्‍वास यांचा दावा : भाजपचा इन्कार
भाजपने आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता व हा प्रस्ताव स्वीकारण्यास भाजपसह आम आदमी पक्षाच्या १२ आमदारांचा पाठिंबा मिळवून देण्याचे आश्‍वासनही दिले होते असा दावा ‘आप’चे नेते कुमार विश्‍वास यानी केला आहे.
दिल्लीत सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. विश्‍वास यांच्या म्हणण्यानुसार गेल्या १९ मे रोजी नवनिर्वाचित खासदार त्यांच्या गाझियाबाद येथील घरी आले व ते तीनपर्यंत आपल्या घरी होते. भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यास सहकार्य करण्याची विनवणी ते करीत होते, असे विश्‍वास यानी म्हटले आहे. तसेच पुन्हा निवडणुकीस उत्सुक नसलेले १२ आमदार आपल्याला पाठिंबा द्यायला तयार असल्याचे ‘त्या’ खासदारांनी सांगितले असे विश्‍वास म्हणाले. हा प्रस्ताव मान्य केल्यास भाजपच्या बड्या नेत्याची भेट घालून देण्याचे आमिषही त्यांनी आपल्याला दाखवले. मात्र हा प्रस्ताव आपण फेटाळल्याचे त्यानी सांगितले. तथापि सदर खासदाराचे नाव सांगण्यास त्यानी नकार दिला.
दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आर. पी. सिंह यानी विश्‍वास यांचा दावा फेटाळला आहे. विश्‍वास एवढ्या दिवसांनंतर का बोलत आहेत असा प्रश्‍न त्यानी केला.