![Hero ISL 2018 M6 - ATK v Northeast United FC](https://navprabha.com/wp-content/uploads/2018/10/16lanzarote.jpg)
नवी दिल्ली
इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमातील दुसर्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत झालेला दोनवेळचा विजेता ऍटलेटिको दी कोलकाता व दिल्ली डायनामोज यांच्यात हा सामना होणार आहे. नेहरू स्टेडियमवर होणार्या या सामन्यात यजमान संघाचा बालेकिल्ला काबीज करण्याचा एटीकेचा प्रयत्न राहील.
एटीकेला सलामीला केरला ब्लास्टर्सविरुद्ध ०-२ असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध आणखी एक हार पत्करावी लागली. कॉपेल यांच्या कार्यपद्धतीशी जुळवून घेण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. मॅन्युएल लँझारॉटे आणि कालू उचे अशा करारबद्ध झालेल्या महत्त्वाच्या खेळाडूंना अद्याप छाप पाडता आलेली नाही. सलग दोन सामने घरच्या मैदानावर खेळावे लागल्यानंतर आता ही लढत बाहेरच्या मैदानावर (अवे) होणार आहे. त्यामुळे दडपण कमी होऊ शकेल.
आयएसएलमध्ये अलिकडे कोलकात्याच्या संघाला बाहेरील मैदानांवर फारसा लक्षवेधी खेळ करता आलेला नाही. मागील तीन अवे सामन्यांत त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यातच घरच्या मैदानावर चांगले रेकॉर्ड असलेल्या प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दिल्लीने घरच्या मैदानावर सहा सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे. यात १५ गोल नोंदविताना आठ पत्करले आहेत. जोसेप गोम्बाऊ यांच्या संघाने पहिल्या सामन्यात एफसी पुणे सिटीविरुद्ध गोलच्या अनेक संधी निर्माण केल्या. त्यांनी १-१ अशी बरोबरी साधली. दिल्लीच्या जिगरी संघाने उत्साहवर्धक खेळ केला. केवळ अंतिम टप्यात त्यांना गोल पत्करावा लागला.
दिल्लीचा संघ चेंडूवर बहुतांश ताबा राखण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे एटीके चिवट बचाव करून प्रतिआक्रमण रचण्याचा प्रयत्न करेल.
कालू उचे याच्याशिवाय लँझारॉटे याच्याकडूनही एटीकेला अपेक्षा असतील. कालू पूर्वी दिल्लीकडून खेळला. गेल्या मोसमात त्याने १३ गोल केले. लँझारॉटे याच्यावरही आक्रमणाची मदार असेल. जियान्नी झुईवर्लून याच्या नेतृत्वाखालील बचाव फळी भेदण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. दिल्लीला बराच वेग राखता येईल. लालियनझुला छांगटे आणि नंदकुमार यांची एटीकेच्या बचावफळीविरुद्ध कसोटी लागेल. राल्टे दुसर्या यलो कार्डमुळे निलंबित आहे. अशावेळी कॉपेल वेगवान विंगर्सविरुद्ध लेफ्ट-बॅक म्हणून कुणाला संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ही लढत डावपेचात्मक पातळीवर रंगेल. दोन वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा अवलंब करणार्या प्रशिक्षकांचे डावपेच पणास लागतील. यात कुणाची सरशी होणार याची उत्कंठा शिगेला पोचली आहे.