दिमाखदार!

0
14

महंमद शामी आणि महंमद सीराजच्या तुफानी गोलंदाजीद्वारे श्रीलंकेचा डाव अवघ्या पंचावन्न डावांत गुंडाळून आणि प्रचंड धावफरकाने सामना जिंकून भारताने सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीसाठी सर्वांत प्रथम पात्र होण्याचा बहुमान मिळवला आहे. ह्या स्पर्धेतील आजवरचे सर्वच्या सर्व सामने जिंकून अव्वलस्थानी दिमाखात पोहोचलेल्या भारतीय क्रिकेट संघाकडून पुन्हा एकवार ह्या विश्वचषकावर आपली मुद्रा कोरली जाईल अशी अपेक्षा त्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या मनात अंकुरली आहे. दक्षिण आफ्रिकेशी उद्या होणार असलेल्या उपान्त्य सामन्यातून पुढील चित्र स्पष्ट होईल, परंतु आजवरच्या सर्वच सामन्यांतून भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या दोन्ही बाबतींमध्ये केलेली दुहेरी कामगिरी खरोखरच संस्मरणीय म्हणावी अशीच आहे. केवळ फलंदाजीतच नव्हे, तर त्याहूनही गोलंदाजीमध्ये भारतीय गोलंदाजांनी जी कमाल दाखवली ती गतकाळातील वेस्ट इंडिजच्या तुफानी गोलंदाजीची आठवण करून देणारी आहे. खरे तर पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताने आपल्या अद्भुत गोलंदाजीची कमाल दाखवत जिंकला, तेव्हाच भारतीय क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेले होते. गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये तर त्या संघाला भारतीय गोलंदाजांनी ज्या निर्दयपणे चिरडून टाकले, ते कमालीचे होते. फलंदाजीमध्येही भारतीय खेळाडूंची कामगिरी प्रशंसनीय होती. खरे तर कप्तान रोहित शर्मा दिलशान मदुशंकामुळे स्वस्तात बाद झाला तेव्हा पुढे काय होणार ह्या शंकेने क्रिकेटरसिकांना घेरले होते, परंतु नंतर जी तुफान फटकेबाजी झाली आणि धावांमागून धावा निघाल्या, तेव्हा भारताने हा सामना खिशात टाकला आहे ह्याची चाहूल मिळायला लागली होती. विराट कोहली, शुभमन गिल यांनी दमदार भागिदारी केली, मात्र दोघांचीही शतके हुकली ह्याची चुटपूट चाहत्यांना लागून राहिली. के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव यांनीही खेळ पुढे नेलाच, पण फॉर्म गवसलेल्या अय्यरने 56 चेंडूंत तुफानी 82 धावा काढत भारतीय संघाची धावसंख्या तीनशेपार केली. उरलेली कसर रवींद्र जडेजाने भरून काढली. त्यामुळे पन्नास षटकांच्या अखेरीस जेव्हा भारताचा डाव आठ बाद 357 वर थांबला, तेव्हा श्रीलंकेचा संघ हे जबरी आव्हान पेलू शकेल का असा प्रश्न सर्वांसमोर पडला होता. खरोखरच त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकवार आपली जी कमाल दाखवली ती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. बुमराहच्या पहिल्याच चेंडूपासून हा जो काही बळींचा सिलसिला सुरू झाला, तो श्रीलंकेचा डाव गुंडाळला जाईपर्यंत कायम राहिला. महंमद सिराजने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अवघ्या 21 धावांत सहा बळी घेतले होते. ह्यावेळीही त्याने फलंदाजांचा घास घ्यायला सुरुवात केली. महंमद शामीनेही पाच पाच बळी घेण्याचा आपला धडाका कायम ठेवत 12.91 च्या सरासरीने अवघ्या चौदा सामन्यांत सर्वाधिक 45 बळी घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला. झहीर खान आणि श्रीनाथचा विक्रम शामीने तोडला आहे. एवढ्या कमी सामन्यांत आणि कमी धावांच्या सरासरीने एवढे बळी घेणारा कोणी त्याच्या जवळपास नाही. फलंदाजीत विराट कोहलीही ह्या स्पर्धेतील 1472 धावांसरशी धडाकेबाज फलंदाज ठरला आहे. 2278 धावा मिळवणारा सचिन, 1743 धावा घेणारा रिकी पाँटिंग आणि 1532 धावा पटकावणारा कुमार संगकारा यांच्या खालोखाल विराट जाऊन पोहोचला आहे. भारतीय संघाची ह्या विश्वचषक स्पर्धेतील एकूणच कामगिरी बहारदार ठरली आहे. क्रिकेटकडे चाहत्यांना पुन्हा खेचून आणणारी ही कामगिरी आहे ह्यात शंका नाही. केवळ फलंदाजीवरच भारताचा डोलारा नाही हा ह्या संघाचा लक्षणीय विशेष आहे. फलंदाजीइतकीच किंबहुना फलंदाजीहूनही अधिक सरस गोलंदाजी करून दाखवून संघाच्या अष्टपैलूत्वाचा साक्षात्कार भारतीय क्रिकेट संघाने घडवला आहे. कप्तान रोहित शर्माचे शांत, संयमी, परंतु त्याचबरोबर योग्यवेळी योग्य निर्णय घेणारे नेतृत्व, राहुल द्रवीडचे अनुभवी मार्गदर्शन आणि खेळाडूंमधील कमालीची संघभावना ह्या सगळ्यांतून हे विजयामागून विजय साकारत आहेत. रोहित शर्मा प्रत्यक्ष मैदानावर आपल्या सहकाऱ्यांना ज्या तत्परतेने सूचना देत असतो, मार्गदर्शन करीत असतो, ते पाहण्याजोगे असते. उपांत्यफेरीत पोहोचणारा पहिलावहिला संघ ठरण्याचा मान तर भारताला मिळाला आहेच, शिवाय आजवरचे सातपैकी सातही सामने शानदारपणे जिंकणारा अजिंक्य संघही भारत ठरला आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटरसिकांना ओढ लागली आहे ती विश्वचषकावर भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी पुन्हा एकवार कोरले जाण्याची. कोट्यवधी भारतीयांना आपले फलंदाज आणि गोलंदाज निराश करणार नाहीत अशी अपेक्षा बाळगूया!