दारू तस्करी टोळीच्या शोधार्थ गुजरात पोलीस गोव्यात

0
6

म्होरक्याच्या शोधासाठी काणकोण तालुक्यासह होंडा येथे छापे

दारू तस्करी प्रकरणात हात असलेल्या एका आंतरराज्य टोळीच्या शोधात गुजरात पोलीस गोव्यात आले असून काणकोण तालुक्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुजरात पोलिसांनी काल शोधमोहीम हाती घेतली आहे. या टोळीचा म्होरक्या असलेल्या लिगोरिनो डिसोझा याच्या शोधात पोलीस असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गांधीधाम, गुजरात येथील पोलिसांचे एक पथक तेथील उपनिरीक्षकाच्या नेतृत्त्वाखाली गोव्यात दाखल झाले असल्याचे काणकोण पोलिसांनी स्पष्ट केले.

शनिवारी गोव्यात दाखल झालेल्या गुजरात पोलिसांच्या पथकाने या दारू तस्करी प्रकरणी काणकोण व होंडा येथे छापे मारले. या दारू तस्करीप्रकरणी आम्ही गुजरात पोलिसांना तपासकामासाठी मदत करीत आहोत. गुजरात पोलीस लिगोरिनो डिसोझा यांच्या शोधात आहेत, अशी माहिती काणकोण पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी दिली.

दरम्यान, गांधीधाम येथील पोलीस उपनिरीक्षक बी. एस, जाला यांनी, आम्ही दारू तस्करी प्रकरणातील म्होरक्या लिगोरिनो डिसोझाच्या शोधात असल्याचे सांगून गोव्यातून मोठ्या प्रमाणात गुजरातला दारू तस्करी होऊ लागलेली आहे. त्याप्रकरणी आम्हाला लिगोरिनो डिसोझा व त्याच्या टोळक्यातील अन्य सदस्य हवे असल्याचे जाला यांनी स्पष्ट केले. यासंबंधीची तक्रार गांधीधाम पोलिसांत करण्यात आली असल्याची माहिती जाला यांनी दिली.

काणकोण पोलिसांच्या मदतीने आम्ही लिगोरिनो डिसोझा यांच्या शोधात आहोत. पण तो सध्या बेपत्ता आहे, अशी माहिती जाला यांनी दिली. हल्लीच्या काळात काणकोण येथून मोठ्या प्रमाणात गुजरातला दारूची तस्करी होऊ लागल्याचे आढळून आले असल्याचे जाला यांनी स्पष्ट केले.

या तस्करी प्रकरणात गोव्यातील अबकारी खात्यातील काही अधिकारीही गुंतले असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी गोव्याच्या अबकारी खात्यातील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचे गुजरात पोलिसांनी स्पष्ट केले आहे.