मडगाव (क्री. प्र.)
गुडी-पारोडा येथील दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाने अंतिम सामन्यात कुंकळ्ळी युनायटेड उच्च माध्यमिक विद्यालयाचा ३-० अशा गोलफरकाने पराभव करीत क्रीडा व युवा व्यवहार संचालनालय पणजी आयोजित विभाग ४ आंतर उच्च माध्यमिक विद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद प्राप्त केले.
कुंकळ्ळी येथील सरकारी ग्राम शाळेच्या मैदानावर खेहविण्यात आलेल्या सामन्यात दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखताना ४थ्याच मिनिटाला आपले खाते खोलले. आल्वितो ओलिविराने कुंकळ्ळीच्या गोलरक्षकाला चकवित दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाला आघाडीवर नेणारा हा गोल नोंदविला. १०व्या मिनिटाला आल्विताने स्वतःचा व दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाचा दुसरा गोल नोंदवित आघाडी २-० अशी केली. पहिल्या सत्रात त्यानी आपली आघाडी राखली.
दुसर्या सत्रात कुंकळ्ळी युनायटेड उच्च माध्यमिक विद्यालयाने पिछाडी भरून काढण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु त्यांना दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गोलरक्षकाला भेदता आले नाही. सामना संपण्यास १० मिनिटांचा अवधी बाकी असताना आल्वितोने स्वतःची हॅट्ट्रिक साधताना दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाला ३-० अशा विजयासह जेतेपद प्राप्त करून दिले.
बक्षीस वितरण सोहळ्याला कुंकळ्ळी युनायटेड कला व वाणिज्य महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रामलाल वेर्णेकर यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्यांनास प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. एपीईओ जॉन फर्नांडिस यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले. केपेचे टीएसओ मोतिलाल गावकर आणि काणकोणचे टीएसओ प्रकाश वेळीप यांची यावेळी उपस्थिती होती.
विजेता आणि उपविजेता संघ आता १६ ऑक्टोबर रोजी फातोर्डाच्या ऍस्ट्रोटर्फ मैदानावर होणार्या आंतर विभाग स्पर्धेसाठी विभाग ४ चे प्रतिनिधित्व करणार आहेत.