काल मंगळवारी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकार्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत २४ लाख २२ हजार रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. कस्टम अधिकार्यांनी प्रवाशांची झडती घेतली असता एका प्रवाशाकडे १५ लाख तर दुसर्याकडे ९ लाख २२ हजार रुपये किंमतीचे सोने सापडले.
मिळालेल्या माहितीनुसार पहिली कारवाई पहाटे करण्यात आली. मस्कतहून ओमान एअरव्हेज डब्ल्यू व्हाय २०९ या विमानातून आलेला एक केरळीयन प्रवासी विमानतळावरील ग्रीन चॅनलमधून बाहेर पडत असताना हवाई गुप्तहेर अधिकार्यांना त्याचा संशय आला. त्यांनी त्या प्रवाशाला आगमन कक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ अडविले व त्याच्या सामानाची झडती घेतली असता ट्रॉलर बॅगेच्या तळभागात ५८० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पातळ पट्ट्या लपवून ठेवून त्यावर रेक्झिनचे कापड चिकटविलेले आढळले. त्याची किंमत १४,९२,५१४ रुपये आहे.
दरम्यान, विनानतळावरील सीमा शुल्क अधिकार्यांनी केलेल्या आणखी एका कारवाईत दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या केरळीयन प्रवाशाला मुख्य प्रवेद्वाराजवळ अडवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या बॅगेत ३४८ ग्रॅम वजनाचे सुमारे ९ लाख २२ हजार ९८६ रुपये किंमतीचे सोन्याचे बिस्किट सापडले. या दोन्ही कारवाया गोवा सीमा शुल्क आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.