दाबोळी विमानतळाला अधिक बळकटी मिळणार ः मुख्यमंत्री

0
5

>> केंद्रीय मंत्री नायडू यांच्यासोबत चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री के राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्ली येथे काल भेट घेऊन दाबोळी विमानतळाच्या विषयाचा पाठपुरावा केला.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दाबोळी विमानतळाला अधिक बळकटी देण्यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भेटीनंतर दिली. दाबोळी विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमाने आपली सेवा मोप येथील विमानतळाकडे स्थलांतरित करीत असल्याने दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गोवा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली होती.

याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर दाबोळी विमानतळाचा प्रश्न मांडण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नवी दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची काल गुरूवारी भेट घेतली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दाबोळी विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमाने मोपा विमानतळावर स्थलांतरित होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. दाबोळी विमानतळावरील समस्या आणि विमानतळ कायमस्वरूपी कार्यरत ठेवण्याच्या विषयावर चर्चा केली. केंद्रीय मंत्र्यांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, नागरी विमान वाहतूक सचिव वुम्लुन्मंग वुलनाम आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश यांची उपस्थिती होती.