>> १५० कोटी खर्चून समांतर टॅक्सी ट्रॅक
संपुर्ण जगाच्या नकाशावर गोवा हे महत्वाचे पर्यटनस्थळ बनल्याने देशाबरोबर गोव्यातही दिवसेंदिवस हवाई प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढत आहे. त्यासाठी दाबोळी विमानतळावर बरोबर मोपा विमानतळाची अत्यंत गरज असून आता दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरणाचे काम चालू आहे. येथे अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध करून या विमानतळाचा कायापालट करण्यात येणार आहे.
यासाठी भारतीय नौदलाने ८० टक्के जमीन दिलेली आहे. अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन डॉ. गुरुप्रसाद माहोपात्र यांनी दाबोळी विमानतळावरील प्रशासकीय कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
भारतात यापुढे सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून १५ विमानतळांचे टर्मिनल विस्तारीकरण करण्यात येईल. याव्यतिरिक्त सिक्कीम, अरूणाचल प्रदेश येथील तेजू आणि ओडिसा येथील जासुदा हे तीन नवीन विमानतळ उभारण्यात येत असून देशातून आणखी ९०० विमानांची ऑर्डर्स देण्यात आलेली असल्याने भविष्यात हवाई प्रवासात वाढ होणार आहे, असे सांगताना गोव्यात २ दशलक्ष प्रवासी वर्षाकाठी हवाई मार्गे येत असून याची दखल घेऊन विमानतळावर अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्चून आणखी एक टर्मिनल इमारत उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले. भारतीय नौदलाने आपली ८० टक्के उपलब्ध करून दिलेल्या जमिनीत सुमारे १५० कोटी रुपये खर्चून समांतर टॅक्सी ट्रॅक बांधला जाईल व तो सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे या विमानतळावर रात्रीच्यावेळी विमाने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होईल. तसेच विमाने उतरवण्यासाठी व उड्डाणासाठी लागणार्या वेळेची बचतही होणार व अधिक विमाने उतरवण्याची सोयही होणार आहे. गोव्यात वाढत्या हवाई प्रवाशांची संख्या पाहता दाबोळी बरोबर मोपा विमानतळाची गरज असून दाबोळी विमानतळामुळे दक्षिण गोव्याचा विकास झाला आहे तर मोपा विमानतळामुळे उत्तर गोव्याचा विकास होईल असे त्यांनी सांगितले.