दाबोळीतील नौदलाकडील जमीन गोवा सरकारला द्या

0
77

लुईझिन फालेरोंचे पर्रीकरांना पत्र
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र पाठवून नौदलाच्या ताब्यात असलेली दाबोळी येथील १२.५ एकर जमीन गोवा सरकारच्या ताब्यात देऊन विमानतळ विस्तारासाठी मदत करावी, अशी मागणी केली आहे.आपण मुख्यमंत्री असताना या विषयाचा पाठपुरावा केला होता. तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी वरील जमीन गोवा सरकारच्या ताब्यात देण्याचे ठरवून सोपस्कारही सुरू केले होते. २०१० मध्ये नौदलाने जमीन देण्याची तयारी केली होती. त्यानंतर नौदलाने जमीन न देण्याचे ठरविले. आतापर्यंत आपण सर्वच केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना जमिनीसाठी पत्रे पाठविली आहेत.
आता गोमंतकीय सुपूत्रच केंद्रीय संरक्षणमंत्री असल्याने येथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भूमीपुत्र या नात्याने दाबोळीच्या विस्तारासाठी वरील जमीन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी फालेरो यांनी पत्रात केली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री झाल्याबद्दल पर्रीकर यांचे फालेरो यांनी अभिनंदनही केले आहे.
दरम्यान, मोप विमानतळ स्थगित ठेवून दाबोळीचाच विस्तार करावा, अशी मागणी फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत केली. मोप रद्द करण्याची त्यांनी मागणी केलेली नाही. दाबोळी विमानतळ २४ तास खुला ठेवावा, धावपट्टीचे रुंदीकरण करावे व दाबोळी विमानतळाला १३ वा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून दर्जा प्राप्त करून देण्यासाठी तेथे सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणीही फालेरो यांनी केली.