दाबोळी विमानतळावरील ग्रेड सेपरेटर उड्डाण पुलावरून जात असताना दुचाकीचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याच्यासह मागे बसलेला अन्य एक जण उड्डाण पुलावरून खाली कोसळला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. दोघेही होन्नावर-कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे वास्को पोलिसांनी सांगितले.
बुधवारी दुपारी 1.45 च्या सुमारास चिखलीमार्गे दाबोळी विमानतळावरील ग्रेड सेपरेटर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने दोघेजण दुचाकीवरून (क्र. केए-47-यू-2940) निघाले होते. त्यावेळी चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने कठड्याला धडक बसली. त्या धडकेबरोबरच दोघेही उड्डाण पुलावरून खाली कोसळले आणि गंभीररित्या जखमी झाले. त्यात पॅटसन पॅट्रीस रॉड्रिगीस (24) जागीच ठार झाला, तर प्रज्वल उदया रॉड्रिगीस (27) याला उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल केले. तो गंभीररित्या जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले; मात्र त्याला तेथे मृत घोषित केले. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात ठेवण्यात आले आहेत.