कुठेतरी आग लागल्याविना कधी धूर येत नसतो. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या पक्षांतराच्या वावड्यांनी काल महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले. चार वर्षांपूर्वी एका रात्री अचानक गायब होऊन भल्या पहाटे देवेंद्र फडणविसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा त्यांचा पराक्रम जगजाहीर असल्याने अजित पवारांचा फोन जरा नेटवर्कबाहेर गेला, तरी त्यांच्या पक्षांतराच्या वावड्या उडू लागतात. त्यांना स्वतःलाही त्यात मजा येत असावी. त्यामुळे आपले पूर्वनियोजित कार्यक्रम अचानक रद्द करणे, अकस्मात अज्ञातवासात निघून जाणे, सर्वत्र पक्षांतराच्या वावड्या उडत असूनही स्पष्ट इन्कार करण्यात वेळकाढूपणा करून मुद्दाम संभ्रमावस्था कायम ठेवणे अशा करामती अजितदादा करीत असतात. कालचा प्रकारही यातलाच होता. शेवटी आधी काकांनी आणि नंतर पुतण्याने या कथित पक्षांतराचा इन्कार केला, तेव्हा कुठे राजकीय वादळ थोडे थंडावले. पण अजितदादांची कीर्तीच अशी आहे की मनात येताच ते पुन्हा कधी राजकीय खळबळ माजवतील याचा नेम नाही.
मुळात सध्या अजित पवारांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगायला कारण झाला तो अमित शहांचा नुकताच झालेला महाराष्ट्र दौरा. यावेळी अजितदादा – अमित शहांची भेट झाल्याची बातमी आली. शिवसेनेच्या मुखपत्रातून, सामनामधून भाजप फोडाफोडीच्या प्रयत्नात असल्याचे संजय राऊतांनी आपल्या साप्ताहिक सदरात लिहिले. आणि अशातच अजितदादा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून गायब झाले. त्यामुळे काही वृत्तपत्रांनी सुतावरून स्वर्ग गाठत अजितदादा भाजपात दाखल होणार असल्याच्या, दोन तृतीयांशचे बहुमत निर्माण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याच्या बातम्या दिल्या, ज्या वाऱ्याच्या वेगाने पसरल्या. सध्या जरी अजितदादांनी याचा इन्कार केलेला असला, तरी आज ना उद्या त्यांच्या पक्षांतराची शक्यता नाकारता येत नाही हेही तितकेच खरे आहे. याची काही ठळक कारणे आहेत. पहिली बाब म्हणजे भाजपाची साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा दबाव आहे. नुकताच राष्ट्रीय पक्षाचा गमावलेला दर्जा, केंद्रीय यंत्रणांनी नेत्यांमागे सतत लावलेला चौकशीचा ससेमिरा आणि कारवाईचा बडगा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हैराण झालेले आहेत. दुसरीकडे, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सोळा आमदारांविरुद्ध उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे विचाराधीन आहे आणि तो निकाल जर शिंदे गटाच्या विरुद्ध लागला तर महाराष्ट्रातील सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. प्रसंगी शिंदेंचा बळी देऊन भाजपला आपले सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे अजितदादा हा त्यांच्यासाठी उपयोगाचा मोहरा आहे. अजितदादांनाही ही मैत्री हवीहवीशी वाटणे साहजिक आहे. पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा विषय अरविंद केजरीवालांनी काढला तेव्हा मोदींच्या करिष्म्याचे कौतुक अजितदादांनी केले होते ते उगीच नव्हे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या पाठी केंद्रीय यंत्रणा हात धुवून लागल्या आहेत. अनिल देशमुख, नवाब मलीक, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल आणि खुद्द अजित पवार हेही त्यातून सुटलेले नाहीत. खुद्द शरद पवारांपर्यंत ईडी मागे पोहोचली होती. केंद्रीय यंत्रणांचा हा किंवा असा संभाव्य ससेमिरा चुकवण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक मंडळींना भाजपशी जवळीक हवीशी वाटू लागली आहे. काल अजितदादांच्या पक्षांतराच्या वावड्या उडताच राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अगदी उघडपणे भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली त्याचे हेच प्रमुख कारण होते. अजितदादा आपल्यामागे कितीजण आहेत याची चाचपणी अशा नौटंकीतून करीत आहेत का हाही प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादांच्या पक्षांतराची चर्चा काल शिगेला पोहोचली तरी शरद पवार काल शांत होते. पवारांची शांतता म्हणजे खरे वादळ असते. गेल्यावेळी अजितदादांचे बंड त्यांनी काही फोन करून कसे मोडून काढले होते ते देशाने पाहिलेच आहे. काल अजितदादांच्या पक्षांतरावरून राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना स्वतः पवार शांत होते. पवारांपुढचा पेच वेगळा आहे. एकीकडे त्यांना आपल्या पक्षाची निधर्मी प्रतिमा जपायची आहे. दुसरीकडे विरोधी आघाडीच्या नेतृत्वाच्या आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाग्या ठेवायच्या आहेत. पण दुसरीकडे भाजपचे शुक्लकाष्ठ आपल्या मागे लागणार नाही, पक्ष सत्तेची ऊब देऊन जिवंत ठेवायचा आहे, हेही पाहायचे आहे. त्यामुळेच पवार सध्या कुंपणावर आहेत. अजितदादा अधूनमधून हुळहुळत असले तरी जोवर काका हिरवा कंदील देणार नाहीत, तोवर थांबावे लागेल एवढे शहाणपण अजितदादांत असेलच!