- शरत्चंद्र देशप्रभू
1963 साल. एप्रिल-मे महिना असावा. वडिलांची बदली दमणला झालेली. आमचा मुक्काम साप्ताहिक किंवा इतर सुट्टीच्या दिवसांत माहिमला मातोश्रींच्या मावशीच्या नव्याकोऱ्या फ्लॅटात असायचा. त्याकाळी मुंबईत फ्लॅटला ‘ब्लॉक’ म्हणायचे. अशाच एका संध्याकाळी दुपारची उन्हे कलल्यावर सारी मंडळी दादरला निघाली. आम्हा गोवेकरांना मुंबईचे अप्रूपच. भीतीयुक्त आकर्षण. दादरच्या त्या गर्दीत छोटा भाऊ हरवला. मुंबईकर नातेवाइकांनी आम्हाला धीर देत शोधमोहीम सुरू केली. यात अर्ध्यातासावर वेळ गेली; परंतु ते आमच्यासाठी युगच. इतक्यात एक बाई भावाचा हात धरून विचारपूस करताना दिसली. तिची मराठी याला समजत नव्हती अन् आठ वर्षांच्या मुलाची कोंकणी त्या बाईला अगम्य. परंतु त्या अनोळख्या बाईचा दृष्टिकोन आपुलकीचा वाटला. हाच आपलेपणा दादरच्या तनामनात खोलवर रुजलाय. साठ वर्षे झाली तरी हा माणुसकीचा ओलावा जीवनाच्या व्यग्र उठाठेवीत अजून तरी शुष्क झालेला नाही.
पश्चिम दादरला ‘रूपसंगम’ अन् ‘दादर एम्पॉरिअम’ ही विविध प्रकारचे कापड विकणारी आस्थापने आहेत. एकेकाळी ही दादरची मानबिंदू मानली जायची. गोवेकरांची पण या आस्थापनाला पसंती. कुठलेही कार्य असूद्या; खरेदी करायची ती या आस्थापनातच. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. गोवेकरांनी आपला मोर्चा बेळगाव, पुणे, बंगळुरूला वळवला. काहींनी गोव्यातच खरेदी करायचा पर्याय निवडला. मुंबई विस्तारत गेली तशी उपनगरांत कापडाची दुकाने थाटली गेली. दूर दादरला जाण्यापेक्षा उपलब्ध कपडे खरेदी उपनगरांच्या परिसरातच होऊ लागली. हे बदल आस्थापनाच्या बदलत्या व्यवस्थापनाने निर्विकारपणे, आदळआपट न करता स्वीकारले. मालकांची, कर्मचाऱ्यांची देहबोली बदलली नाही. मार्केटिंगच्या तंत्रात, शैलीत पारंपरिक वैशिष्ट्ये अजून टिकवून ठेवलेली प्रतीत होतात. आतिथ्यात फरक नाही. व्यवसायाने आक्रमक धोरण राबवलेले दिसत नाही. गिऱ्हाइकांची अजिजी नाही, तसेच तुसडेपणा पण नाही. नदीच्या विशाल पात्रातल्या संथ, भारदस्त प्रवाहासारखा धंदा अव्याहतपणे सहा दशकांनंतर तसाच चालतो आहे.
गेली तीस-पस्तीस वर्षे आमचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या आयुर्वेदाचार्य सदानंद सरदेशमुख यांच्या दवाखान्यात कैक वेळा जाणे होते. खोदादाद सर्कलला वळसा घेतला की शारदा टॉकिजच्या जवळ ही जुनीपुराणी इमारत अजून सुस्थितीत उभी आहे. याच ग्रंथालयात ‘गोमन्तक’चे पहिले संपादक बा. द. सातोस्करांनी ग्रंथपालपद भूषवल्याचे सांगण्यात येते. ज्या ‘खोदादाद’ सर्कलला जयवंत दळवींनी आपल्या साहित्यातून अमर केले ते खोदादाद सर्कल फ्लाय ओव्हरने झाकोळून गेल्याचे दिसते. स्मरणाच्या पुरातत्त्व विभागात याची नेमकी जागा अन् स्वरूप डोळ्यांसमोर आणायला बरेच खोदकाम करावे लागले.
डॉ. सरदेशमुखांच्या दवाखान्यात पेशंटसाठी नावे लिहिण्यासाठी एक वही ठेवण्याची पद्धत आहे. पूर्वी पेशंट नावे देवनागरी लिपीत लिहायचे. कालांतराने काही नावे देवनागरीत, तर काही रोमी लिपीतून लिहिली जाऊ लागली. कालच्या भेटीत तर सारीच नावे रोमी लिपीतून. बहुतेक पेशंट मराठी. याच काळात मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानिमित्ताने वर्तमानपत्रांत मुख्य पृष्ठावर मोठमोठे मथळे अन् मजकूर दिसून येत होता. परंतु या वहीच्या निमित्ताने सांकेतिकदृष्ट्या का होईना, मराठीच्या गाभ्याची घट्ट वीण विसविशीत झाल्याचे दिसून येत होते. हीच गोष्ट पेहरावाबद्दल. मराठी भाषा अन् पेहराव तरुणाईने आपल्या मनातून हद्दपार केल्याची जाणीव होत होती. परतीचे बंध पण कमजोर झाल्याचे जाणवत होते. जागतिकीकरणाच्या भन्नाट वेगात किती भाषा जगणार अन् किती नव्या अवतरणार हे काळच ठरवेल. जीवनाच्या धबडग्यात आपली भाषा, समृद्ध वाचनसंस्कृती रुजवणे हे प्रयत्न कालबाह्य ठरत आहेत. परंतु याचे दृश्य दुष्परिणाम व्यक्तिगत अन् सामाजिक जीवनात जाणवत नाहीत. दुर्धर स्थितीत इलाजाची शक्यता पूर्णपणे मावळलेली असते. परंतु इतके असूनही भौतिक प्रगतीच्या वेगवान प्रवाहाला समांतर असा सांस्कृतिक उत्थान अन् संवर्धनाचा प्रवाह दादरच्या संस्कृतीत निरंतरपणे वाहताना दिसत आहे.
रानडे रोडवरच्या एका गल्लीच्या तोंडाशी विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तर दुसऱ्या बाजूला स्वामी समर्थांचा शतकापूर्वी स्थापन झालेला मठ आहे. विठ्ठल-रखुमाई मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कीर्तनोत्सव आयोजित केला जातो. या मंदिराच्या वरच्या भागात कीर्तन विद्यालय कार्यरत आहेत. येथे प्रशिक्षित झालेल्या तरुण मुली पूर्ण तयारीनिशी कीर्तन सादर करताना पाहून आनंद झाला. इथले वैशिष्ट्य म्हणजे श्रोत्यांसाठी कीर्तन ऐकण्यासाठी केलेली खुर्च्यांची व्यवस्था. वयस्कर श्रोत्यांना सुखकारक. गोव्यात पण ही पद्धती अनुसरणे समर्थनीय. गोव्यात कीर्तनकरबुवा समरसून आख्यानात रंग भरण्याचा प्रयत्न करताना दिसतात, तर समोर अंथरलेल्या दोन्ही बाजूच्या सतरंज्या पूर्णपणे रिकाम्या. काही श्रोते सभामंडपाच्या बाजूला सोप्यावर पाय पसरून कीर्तन श्रवण करणार. खुर्च्यांची सोय करायला काय हरकत आहे? कदाचित वृद्ध श्रोत्यांकडून प्रतिसाद मिळू शकेल.
दादरमध्ये पावलोपावली नवरात्रीनिमित्त जगदंबेच्या मूर्ती पुजलेल्या अन् घट बसवलेले दिसले. येथे पण वर्गणी, खंडणी असे प्रकार आढळतात. एकदोन वर्दळीच्या ठिकाणी तर आडदांडपणे आरतीनिमित्त रस्ता अडवण्याचे प्रसंग दृष्टीस पडले. आक्रमक तरुणाई पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत होती. कदाचित राजकीय कार्यकर्त्यांचा पण हस्तक्षेप असेल. दादर म्हणजे गिरगावची विस्तारित संस्कृती, सहजीवन अन् सहकारी तत्त्वावर पोसलेली. परंतु आजच्या या शांत सहजीवनाला मस्तवाल वागणुकीने तडे जात असल्याचे पाहून मन चिंताग्रस्त होते. राजकीय अन् सामाजिक उपक्रमाच्या भेसळीमुळे समाजमन दुभंगणार. याला वेळीच आवर घातला तर दादरची पिढ्यान् पिढ्या जोपासलेली, एकमेकांवर विसंबणारी संस्कृती टिकेल. वाढत्या आशा-आकांक्षांत अन् मर्यादित साधनसुविधांच्या विळख्यात ताणतणावाचे प्रसंग येणे स्वाभाविक, परंतु त्यांचे पर्यवसान अराजकात होणे स्वीकारार्ह नाही. दादरचा आत्मस्वर विकासाच्या कल्लोळात लुप्त होणे म्हणजे मूळ दादर संपवणे. जुन्या पिढीला हे मानवणार नाही. नव्या पिढीला परवडणार नाही. आज दादरच्या पश्चिम भागात टोलेजंग टॉवर उभारणीच्या कामांना अकल्पित गती आलेली आहे. यामुळे संबंधित घटकांना दिलासा मिळत असेलही. कुशल अन् अकुशल बांधकाम कामगारांचे कौतुक करावेसे वाटते. दादरच्या रहिवाशांच्या दिनमानात व्यत्यय न आणता गगनचुंबी इमारतीचे काम विलक्षण चापल्याने होत आहे. आपला जीव धोक्यात घालून उंचीवर काम करणाऱ्या कामगारांच्या तात्पुरत्या गरजा भागतील, परंतु व्यक्तिगत तसेच सामाजिक सुरक्षेचे कुणाला सोयरसुतक नसल्याचे संकेत मिळतात. बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांच्या जाहिराती ‘बेस्ट’च्या वाहनावर व बसथांब्यांवर दिसून येतात. करोडो रुपये खर्च करून मुंबईची मानबिंदू ठरलेल्या ‘बेस्ट’वरच्या या जाहिराती वाचून काय बांधकाम कामगार विविध योजनांखाली अर्ज करणार नाहीत. यासाठी अल्प खर्चात जागृती करण्याच्या योजना आखाव्या लागतील. ‘बेस्ट’सारख्या नावाजलेल्या संस्थेने बांधकाम कामगार कल्याणाच्या कुबड्या घेणे अनुचित वाटते. शिवाय असंघटित कामगारांच्या हक्काच्या पैशाचा विनियोग योग्य रीतीने होणे आवश्यक. गोव्यात पण याबाबतीत भीषण परिस्थिती आहे.
दादरमध्ये सामाजिक, आर्थिक स्तराची दोन टोके दिसून येतात. कोट्यवधी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये राहणारे कोट्यवधी रुपयांच्या गाड्या उडवणारे रहिवासी एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला हातगाडी ओढणारे, स्वयंरोजगारावर अवलंबून असणारे रहिवासी. सिलिंडर, मोठमोठ्या पेट्या हातगाडीवर लादून ओढग्रस्त चेहऱ्याच्या व्यक्ती या गाड्या ओढणार. वजन व अंतरावर मर्यादा नाही. अशाच हातगाड्यांवर प्रवासी वाहतूक चालल्याचे मला कोलकात्यात असताना आढळले. अशाच एका हातगाडीवाल्याच्या मुलीने उच्चशिक्षण घेऊन भारतीय सनदी सेवा स्पर्धेत स्पृहणीय यश मिळवले अन् आपल्या पित्याला हातगाडीवर बसून, सामान ठेवून गाडी चालवली. उच्चपदावर असून, प्रतिष्ठेविरुद्ध सांकेतिक निषेध नोंदवून. इथल्या गाडेवाल्यांच्या, तशाच गरीब कामगारांच्या मनात आता ईर्षा निर्माण झाली आहे. यांची फळे पण मिळत आहेत. मुले आर्थिक मर्यादा असूनसुद्धा विद्याविभूषित होताना दिसत आहेत.
आज दादरमधील महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ उत्पादकांना अकुशल मनुष्यबळाची समस्या जाणवत आहे. चकाकत्या दुनियेत असल्या ग्लॅमरविरहित, असुरक्षित कामाचे कुणालाच आकर्षण उरलेले नाही. अशा प्रकारच्या मनुष्यबळाचे स्रोत आटत चालल्याचे संकेत मिळत आहेत. पाच दशकांपूर्वीची ‘रामागडी’ ही संकल्पना, संस्था अस्तंगत झाली आहे. या संघटनेने, संस्थेने घरकामाचे वैशिष्ट्यपूर्ण आयाम निर्माण केले होते. कोकणच्या संस्कृतीचे झेंडे मुंबईत रोवले होते.