‘दादर’चा चेहरा बदलेल (?)

0
270
  • शरच्चंद्र देशप्रभू

मत्स्यप्रेमींना आपल्या घरच्या जेवणाची सर देणारी ही आस्थापने म्हणजे दादरची शान. जोपर्यंत ही आस्थापने राहतील, फेरीवाले राहतील, फळवाले, फुलवाले राहतील अन्‌‌ मध्यमवर्गीय मानसिकता टिकेल तोपर्यंत दादरच्या संस्कृतीला टॉवरपण हद्दपार करू शकणार नाही.

मागच्या आठवड्यात दादरला तीन-चार दिवस मुक्काम झाला. सुप्रसिद्ध जवाहीर वामन हरी पेठे यांचे एक छोटेसेच ‘ब्ल्यू जेम’ नावाचे हॉटेल रानडे रोडवर आहे. पेठेंची इतर आस्थापनेपण याच इमारतीत कार्यरत आहेत. हॉटेल आलिशान नसले तरी मध्यमवर्गियांच्या आकांक्षा, गरजा पुरवणारे अन् खिशाला परवडणारे! मराठी कलाकारांचे वास्तव्यपण याच हॉटेलात असते. सुप्रसिद्ध निवेदक श्री. सुधीर गाडगीळ पण आम्हाला इथेच कित्येकदा भेटले.

दादरची चाळसंस्कृती आता शेवटचे आंचके देत असल्याचे प्रतीत होत आहे. हे साहजिकच आहे. वेगाने बदलणारा काळ अन् त्या अनुषंगाने झालेला सामाजिक, आर्थिक अन् सांस्कृतिक बदल यामुळे टॉवर संस्कृती अवतरते आहे. पस्तीस मजल्यांचे आकाशाचे वेध घेणारे भव्य टॉवर पाहून डोळे विस्फारून जातात. परंतु साधनसुविधा व सुरक्षेचा विचार केला तर एक प्रश्नचिन्ह उभे राहते.

कै. जयवंत दळवी यांनी ‘दादरचे दिवस’ हा एक अप्रतिम लेख लिहिल्याचे आठवते. जयवंत दळवींना अभिप्रेत असलेले दादर जरी अजून टिकून असले तरी झालेले स्थित्यंतर ठळकपणे उठून दिसते. दळवींनी वर्णिलेला टिळक पूल, रानडे रोडवरच्या फळविक्रेत्या व्यक्ती बदलल्या तरी स्थितीत बदल नाही. दळवी भोळे रोडवरील ज्या कानविंदेंच्या खाणावळीत बांगड्याच्या किस्मूरीचा आस्वाद घ्यायला जात असत ते आता दुर्गा गेस्ट हाउस झाले. दळवींनी खानपानाची केलेली रोचक वर्णने मराठी साहित्यात अनोख्या शैलीमुळे अजरामर झाली. इराणी हॉटेलातील बुरूज पाव व मस्का अन् चहावरील मलयाचा तवंग, तसेच या हॉटेलातील ती गोलाकार टेबले अन् तेलाने ओथंबलेला मटण खिमा. हे सारे वर्णन दळवींच्या शैलीतच वाचायचे अन् समाधी साधायची. कारण गिरगावच्या अनंताश्रमातल्या जेवणाचे ‘ब्रह्मानंदी टाळी’ असे वर्णन जयवंत दळवींसारखाच लेखक करू शकेल. दादरचे मासळी मार्केट म्हणजे दळवींचे आवडीचे स्थळ. तेथील दळवींसाठी सकस मासळी राखून ठेवणार्‍या कोळीणी अन् ताजी मासळी ओळखणारी दळवींची सरावलेली नजर हे सारे मुळातून वाचल्यावर मग या लिखाणाची महती पटते. दादरला भेटलेल्या व्यक्ती आणि वल्लीपण दळवींनी आपल्या मार्मिक शैलीने अजरामर करून ठेवली आहेत. आज दळवींचे हे दादर टिकेल का नाही याची शंका आहे. टॉवरसंस्कृतीमुळे मूळ महाराष्ट्रीयन संस्कृती झाकोळली जाईल याचेपण संकेत मिळत आहेत. गिरगावप्रमाणे मराठी माणूस बाहेर फेकला जाईल का याची मनाला भ्रांत पडत आहे, परंतु आता असे होण्याची शक्यता नाही. कारण मराठी माणूस मला गेल्या तीस वर्षांत जास्त व्यावहारिक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे टॉवर संस्कृतीतसुद्धा आजचा मराठी माणूस नांदताना दिसेल. परंतु दादरचा चेहरा बदलेल हे नक्की!
स्वामी अक्कलकोट स्वामींचा मठ म्हणजे दादरवासियांचे हक्काचे स्थान. शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मठाने दादरवासियांचा अत्युच्च भाविकच या पवित्र स्थानी त्याच्या देहबोलीतून प्रकट होतो. सार्‍या आस्थापनात, मग ते मराठी माणसाचे असो किंवा मारवाड्याचे श्री स्वामी समर्थांची तसबीर दिसून येते. सकाळ-संध्याकाळ या तसबिरीसमोर उदबत्ती लावली जाते. मंदिरात काळानुरूप बदल झाला तसेच परिसरात, व्यक्तीत पण तो झाल्याचे दृष्टीस पडते. फूलविक्रेत्या वय झालेल्या नऊवारीत तर युवा विक्रेत्या जीन्समध्ये. परंतु अन्य मंदिरात दृष्टोत्पत्तीस पडणारा धंदेवाईक दृष्टीकोनाचा कुठेच लवलेशपण जाणवत नाही. स्वामीसमर्थांबद्दल उसळती भक्तीसंवेदना व्यावसायिकांच्या विळख्यात अजूनतरी सापडल्याचे संकेत मिळत नाहीत. यामुळे मंदिराच्या परिसरातली भावते ती असीम शांतता अन् सभामंडपात भक्तियोगात लीन झालेली भक्तमंडळी. त्या क्षणापुरते तरी एका विलक्षण आश्वासक अनुभूतीची जाणीव होते.

अनंतचतुर्दशीच्या मुहूर्तावर होणारे विसर्जन पाहून पुनर्प्रत्ययाचा आनंद झाला. आता सार्वजनिक गणेशोत्सवातला झगमगाट वाढला. डामडौल बदलला, पैशाचा ओघ वाढला. परंतु पारंपरिक फुगड्या, नृत्ये, लेझीम, आरत्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या. मुंबईतील गणपतीसमोरच्या आरत्यांत एक विलक्षण भाव प्रतीत होत होता. देहभान विसरून केलेल्या तालासुरातल्या आरत्यांनी कान तृप्त होत. परंतु यावेळी ‘दादरचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सवातल्या आरत्या फारच बेसूर वाटल्या अन् याचे ना कुणाला सोयरसुतक. विसर्जन मिरवणूक होण्यापूर्वी मोबाईलने फोटो काढण्यासाठी दर्शकांची रेटारेटी. गणेशाची छबी कुणा भक्ताच्या मनात उमटणे नाही. विसर्जन मिरवणुकीत पण टाळ मृदंग नाही तर ड्रम कानावर आडळणारं रौद्र संगीत. या संगीताच्या ठेक्यावर होणारा बेताळ तंत्री स्त्री-पुरुषांचा नाच तर बघवत नव्हता. कुठेतरी वाटत होते की सार्वजनिक गणेशोत्सवातला प्राण हरवलेला आहे. कलागुणांना वाव देणारा, प्रबोधन करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवांची जागा रंगेल धांगडधिंगाड्याने घेतल्याचे जाणवत होते.

दादरला कितीतरी गल्ल्या आहेत. रानडे रोड पण याला अपवाद नाही. अशाच एका गल्लीत एक मुकी मुलगी नाश्ता व जेवण देऊन आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करताना आढळते. अपुर्‍या जागेत, सुविधांत विलक्षण चापल्याने ही मुलगी कशी स्वयंपाक करते, कशी गिर्‍हाईकांना वाढते अन् कधी पार्सल बनविते हे एक गूढच! मुंबईत ‘थांबला तो संपला’ या वास्तवाची प्रखर जाणीव सर्वांनाच सारखी झालेली आहे, हे या मुक्या मुलीच्या अथक प्रयत्नांमुळे जाणवते.

उत्तम प्रकारचा नाश्ता अन् जेवण देणारे तृप्ती हे उपाहारगृह आमचे आवडते. इथे मराठी पद्धतीने बनवलेले विविध पदार्थ चाखावयास मिळतात. मालक व नोकरवर्गपण अदब अन् आतिथ्य करण्यात माहीर. शिवाय कमालीची स्वच्छता. इथे दोन आंधळ्या मध्यमवर्गीय स्त्रिया इथल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येतात. कधी त्यांच्या समवेत एक इसम असतो, कदाचित एकीचा भाऊ असावा. परंतु या दोन्ही स्त्रियांत बहिणींचे नाते नक्कीच नसावे. कारण आपापसातील संभाषण आपापल्या घरासंबधातील घटनांसभोवती केंद्रीत होताना ऐकू येत असे. कधी कधी या दोन्ही स्त्रिया त्या जवळच्या इसम वा नातेवाईकाची मदत न घेता येतात. हॉटेलातील वेटर त्यांना सुरक्षितरीत्या टेबलासमोर आणून आसनस्थ करतो. परंतु घर ते उपाहारगृह त्या प्रवास कसा करतात हे एक आश्‍चर्यच! नैराश्याची छटापण त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नाही. त्यांच्या जीवनोत्सुक सकारात्मक दृष्टीकोनाला सलाम!!
दादरला आपली अशी खास भोजनसंस्कृती आहे. शाकाहारी नाश्त्यासाठी तृप्ती सोडून तांबे उपाहारगृह, प्रकाश हॉटेल तसेच विसावा अन् स्टेशनजवळ अन्य उपाहारगृहे आहेत. दत्तात्रय उपाहारगृह केव्हाच बंद पडले. तसेच मांसाहारी जेवणासाठी सिंधुदुर्ग अन् गोमंतकसारखी रुचकर जेवण देणार्‍या खानावळी आहेत. कोकण उपाहारगृह अन् गोमंतकची शाखापण आहे. सुट्टीच्या दिवशी इथे जेवणासाठी रांगा लागलेल्या असतात.

मत्स्यप्रेमींना आपल्या घरच्या जेवणाची सर देणारी ही आस्थापने म्हणजे दादरची शान. जोपर्यंत ही आस्थापने राहतील, फेरीवाले राहतील, फळवाले, फुलवाले राहतील अन्‌‌ मध्यमवर्गीय मानसिकता टिकेल तोपर्यंत दादरच्या संस्कृतीला टॉवरपण हद्दपार करू शकणार नाही.