>> आके-बायश येथील बंगला फोडला; बारा तासांतील चोरीची दुसरी घटना
आके-बायश, नावेली येथील कल्पतरू गृहनिर्माण वसाहतीलगत भरवस्तीतील आशिष शेख यांचा बंगला फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह २० लाखांच्या मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला. ही घटना सोमवारी रात्री ८ ते पहाटे १.३० या वेळेत घडली. चोरट्यांनी या बंगल्यातील जवळपास १५ लाखांचे दागिने, दीड लाखांची रोकड, ३ लाखांचा कॅमेरा आणि अन्य साहित्य असा २० लाखांचा ऐवज लंपास केला. त्यामळे गृहनिर्माण वसाहतीत व या आलिशान बंगल्यांतील रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, राज्यात बारा तासांत चोरीचा हा दुसरा प्रकार निदर्शनास आला. तत्पूर्वी, सोमवारी दुपारी भरदिवसा कुर्टी-फोंडा येथे नरसिंह नाईक यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी १० लाख रुपयांचा ऐवज लांबवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शेख यांचा बंगला चार-पाच बंगल्याच्या मधोमध आहे. त्यांचे बंधू अस्लम शेख यांचा दोन दिवसांपूर्वी विवाह झाला होता. त्या आनंदात घरची मंडळी होती. सोमवारी रात्री विवाहाचा स्वागत समारंभ शहराबाहेरील एक हॉटेलमध्ये आयोजित केला होता, त्यानिमित्त घरातील सर्व मंडळी, शेजारी स्वागत समारंभाला गेले होते.
हा कार्यक्रम आटोपून रात्री १.३० च्या दरम्यान सर्व कुटुंबीय घरी पोहचले असता, ते आपापल्या खोलीत गेले असता त्यांना सर्व खोल्यांतील कपाटे उघडी असल्याचे आढळले. तसेच कपडे अस्तावस्त करून टाकले होते आणि कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळविल्याचे निदर्शनास आले.
चोर बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील दक्षिण दिशेकडील शौचालयाच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून आत शिरले. त्यानंतर पहिला मजला आणि तळमजल्यावरील सर्व खोल्यांतील कपाटे फोडली. विवाहावेळी वापरलेले सोन्याचे दागिने कुटुंबीयांनी कपाटात ठेवले होते व ते स्वागत समारंभाला गेले होते. मात्र तेथून परतल्यानंतर चोरट्यांनी डाव साधल्याचे आढळून आले.
चोरी झाल्याचे समजताच शेख कुटुंबीयांनी मडगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर हे सहकार्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहचले. तसेच पहाटे ५ वाजता श्वानपथक आणून त्यांनी तपास केला. मडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षा दीपाली सावळ यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.
या बंगल्यापासून अर्ध्या किलोमीटरवर नावेली चर्च, तर दुसर्या बाजूने रेल्वे स्थानक आहे. रावणफोंड ते नावेली रस्त्यालगत आशिष शेख यांचा बंगला असून, त्यावरून रात्रं-दिवस अवजड वाजनांची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावर रात्री पथदीप पेटत नसतात. तसेच पोलिसांची रात्रीची गस्त नसते, अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे ठरले निरुपयोगी
शेख यांच्या बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत; मात्र त्यात कोणतेच फुटेज दिसून आले आहेत. कॅमेरा बसविलेल्या तज्ज्ञांना बोलावून पाहिले; मात्र सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही. त्यामुळे चोरीचे गूढ कायम आहे.
मुजोर चोरट्यांचा खोडकर संदेश
चोरट्यांनी केवळ चोरीच केली नाहीत, तर जाताना एक खोडकर संदेश दूरदर्शन संचावर लिहिला. चोरट्यांनी दूरदर्शन संचावर ‘आय लव्ह यू’ असे लाल खडूने लिहिल्याचे आढळून आले.