दहा राज्ये, एका केंद्रशासित प्रदेशचे राज्यपाल तसेच प्रशासक बदलले

0
17

>> राष्ट्रपती भवनाकडून आदेश जारी

मोदी 3.0 मध्ये प्रथमच 10 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आणि प्रशासक बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री उशिरा 6 नवीन राज्यपाल आणि तिघांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे पंजाबच्या राज्यपालांसोबतच चंदीगडचे प्रशासक म्हणूनही पदभार स्वीकारतील.

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, हरिभाऊ बागडे राजस्थान, माजी केंद्रीय मंत्री आणि 8 वेळा खासदार संतोष गंगवार झारखंडचे, माजी खासदार रमण डेका यांना छत्तीसगडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. कलराज मिश्रा (राजस्थान), विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड), रमेश बैस (महाराष्ट्र), बनवारीलाल पुरोहित (पंजाब-चंदीगड), अनुसुईया उईके (मणिपूर) आणि फगू चौहान (मेघालय) यांना हटवण्यात आले आहे. सी. पी. राधाकृष्णन (झारखंडहून महाराष्ट्र), गुलाबचंद कटारिया (आसामहून पंजाब-चंदीगड), लक्ष्मण आचार्य (सिक्कीमहून आसाम, मणिपूर) या तीन राज्यपालांना इतर राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार असून तिथे राज्यपाल बदलले आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.