दहा खाण लिजांचे नूतनीकरण

0
262

तीन खाण लिजांचे नूतनीकरण आज
खाण खात्याने काल १३ पैकी १० खाणींच्या लिजांचे नूतनीकरण केले. लिजांचे नूतनीकरण करण्यात आलेल्या खाणींमध्ये व्ही. एम. साळगावकर ऍण्ड ब्रदर्स यांच्या ४, तसेच फोमेंतोच्या २ व कुंदा घार्से, जी. एन. अगरवाल, गीताबाला परुळेकर व लितो फेर्रांव यांच्या प्रत्येकी एका खाणीचा समावेश आहे. उर्वरित तीन खाणींच्या लिजांचे नूतनीकरण आज करण्यात येणार असल्याचे खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज नूतनीकरण करण्यात येणार असलेल्या खाणीत नाना बांदेकर यांची १, चौगुलै यांची १ व सेसा गोवा यांची एक खाणींचा समावेश असल्याचे आचार्य यांनी स्पष्ट केले.ज्या खाणींचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे त्या खाण कंपन्यांना नूतनीकरण करण्यात आल्यासंबंधीची कागदपत्र पाठवण्यात आलेली असून येत्या सहा महिन्यांच्या काळात या कंपन्यांना येऊन त्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सह्या कराव्या लागणार असल्याचे आचार्य यांनी सांगितले.
परवाने घेण्याची जबाबदारी कंपन्यांवर
वरील खाणींच्या लिजांचे नूतनीकरण करण्यात आले आहे याचा अर्थ त्यांना उद्यापासून खाणी सुरू करता येतील असा कुणी काढू नये. या खाणी सुरू करण्यासाठी आवश्यक ते परवाने घेण्याची जबाबदारी सदर खाण कंपन्यांवर असेल. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयानुसार अन्य विविध खात्यांकडून पर्यावरणीय दाखल्यांसह, प्रदूषणविषयक दाखले व अन्य सर्व दाखले या कंपन्यांना मिळवावे लागतील. हे दाखले मिळाल्यानंतरच वरील कंपन्यांना खाणी सुरू करता येतील. या खाण कंपन्यांना ‘इंडियन ब्युरो ऑफ माईन्स’कडून खाणीचा नकाशा मंजूर करून घ्यावा लागेल. खनिजाच्या विक्री मुल्याच्या १० टक्के एवढी रक्कम’ गोवा खनिज कायम निधीसाठी राखून ठेवण्याचे बंधनही कंपन्यांना घालण्यात आलेले आहे. कोणत्या खाणीवरून किती खनिज काढता येईल हे खाण खाते ठरवणार आहे. राज्य सरकारने घालून दिलेल्या मर्यादेतच हे उत्खनन करावे लागेल.
त्यानुसार सर्व खाण कंपन्यांना मर्यादा घालून देण्यात येणार आहे. गोवा खनिज धोरण २०१३ नुसार या खाणींच्या लिजांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. अन्य कित्येक अटी या खाण कंपन्यांना घालण्यात आलेल्या असून सध्या विविध जेटींवर जे खनिज पडून आहे त्यावर हक्क सांगता येणार नाही या अटींचाही त्यात समावेश आहे. त्याबरोबर ज्या कंपन्यांनी खनिज काढताना गैरकृत्ये व बेकायदेशीरपणा केला होता त्यांना आता ‘क्लिन चिट’ मिळाली आहे असा अर्थही कुणी काढून नये, असे आचार्य यांनी सांगितले.
१० खाणींच्या लिजांचे आता नूतनीकरण झाले असल्याने या खाणी आता कधी सुरू होऊ शकतील असे आचार्य यांना विचारले असता ते सांगता येत नसल्याचे ते म्हणाले. त्यासाठीची सगळी प्रक्रिया ही सदर खाण कंपन्यांनाच करावी लागणार असून त्यामुळे खाणी नक्की कधी सुरू होऊ शकतील हे खाते सांगू शकत नसल्याचे आचार्य यांचे म्हणणे होते.