प्रश्न ः गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपण नुकतीच सूत्रे हाती घेतली आहेत. तुमच्या भावी योजना काय आहेत. त्याबद्दल सांगाल काय?
उत्तर ः भावी योजना तशा खूप आहेत. मंडळाच्या कारभारात बर्याच सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने कामही हाती घेतलेले आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानामुळे कामे वेगाने होत असतात. शालांत मंडलानेही आता विविध प्रकारचे अर्ज ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सेवा सुरू केलेली आहे. त्याशिवाय आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे ‘इंटरनल मार्क्स’ व क्रीडा गुण शालांत मंडलाकडे ऑनलाइन पाठवून देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी मंडळाने खास सॉफ्टवेअरही विकसित केले आहे. शिवाय शालांत मंडळाचा निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेलाही त्यामुळे गती येणार असून निकालाला होणारा विलंबही नाहीसा होणार आहे.
प्रश्न ः दहावी – बारावीच्या परीक्षा ह्या जास्त स्पर्धात्मक करण्याची आवश्यकता आहे, असे तुम्हाला वाटते काय?
उत्तर ः व्यक्तिशः मला तसं वाटतं. निदान त्या सीबीएससी दर्जाच्या तरी असाव्यात असं मला वाटतं. पण याचा अर्थ आता लवकरच आम्ही त्यासाठी पावले उचलणार आहोत असा अर्थ कुणी काढू नये. त्यासाठी योग्य विचारा अंतिच निर्णय घ्यावा लागणार आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची त्यासाठी मत आजमावणी करावी लागणार आहे. त्यातील फायदे व तोटे याचाही विचार करणे आवश्यक आहे. मला व्यक्तिशः स्वतःला असं वाटतं की ह्या परीक्षा जास्त स्पर्धात्मक केल्या तर सीईटीसारख्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणखी वाढण्याची गरज : सामंत
प्रश्न ः तुम्ही आताच क्रीडा गुणांचा विषय काढला. विद्यार्थ्यांना मागणीनुसार कला गुणही देण्याचा प्रस्ताव आहे का?
उत्तर ः कला क्षेत्रात चांगले काम करणार्या व चमकणार्या विद्यार्थ्यांना कला गुण मिळावेत यासाठी आम्हीही काम सुरू केलेले आहे. त्याबाबत कला आणि संस्कृती खात्याकडे बोलणी सुरू आहेत. मात्र, हे गुण पुढील शैक्षणिक वर्षापासूनच देण्यास सुरूवात होणार आहे. त्यासाठीची आवश्यक ती तयारी व निर्णय झालेला नसल्याने यंदा हे कला गुण देणे शक्य होणार नाही.
प्रश्न ः दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी गेली एक-दोन वर्षे संगणकाचा वापर करण्यात आला होता. यंदाही संगणकाची मदत घेण्यात येणार आहात काय?
उत्तर ः सर्वांत प्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की संगणक उत्तरपत्रिकांची तपासणी करू शकत नाही. कारण उत्तरपत्रिका ह्या वर्णनात्मक असतात. गेल्या काही वर्षांत आम्ही संगणकाची जी मदत घेतली ती शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या गुणांची बेरीज करण्यासाठी. यंदाही त्यासाठी संगणकाचा वापर करावा की नाही याविषयीचा निर्णय ह्या महिन्याच्या शेवटी घेतला जाणार आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी रुपये एवढा खर्चही येत असतो. त्यामुळे योग्य चर्चेनंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
प्रश्न ः आणखी काय बदल करण्याचा विचार आहे?
उत्तर ः बारावीच्या परीक्षाना सध्या विलंब होत आहे असं मला वाटतं. त्यामुळे निकालालाही विलंब होतो आणि सीईटी परीक्षेला बसण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होतात. तसेच राज्याबाहेर शिक्षण घेण्यास जाऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत असते. त्यामुळे बारावीची परीक्षा व निकाल शक्य होईल तेवढ्या लवकर देण्याचा गोवा शिक्षण मंडळाचा विचार आहे.
प्रश्न ः शिक्षण मंडळाकडे आवश्यक साधनसुविधा आहेत काय?
उत्तर ः शिक्षण मंडळाचा कारभार ज्या इमारतीतून चालतो ती इमारत मोडकळीस आलेली आहे. आता लवकरच सुमारे १ कोटी रुपये खर्चून नवी इमारत उभारण्यात येणार आहे. नवी इमारत उभी झाली की आणखी नव्या गोष्टीही येतील हे नक्की. बदलत्या आव्हानांना सामोरे जाणे व अद्यावत राहणे त्यासाठी प्रयत्नरत आहोत. शिक्षणच मानवजातीला पुढे घेऊन जाणारे असल्याने शिक्षणाच्याबाबतीत आम्ही मागे पडू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाईल.