>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
राज्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग दिवाळीनंतर येत्या २१ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावरील वर्गाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यालयांना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून वर्ग घ्यावे लागणार आहेत. दहावी आणि बारावीच्या मुलांना प्रात्यक्षिक महत्त्वाचे असल्याने वर्ग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण खात्याकडून विद्यालयांना वर्ग घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाठविल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
राज्यातील बहुतांश अनुदानित विद्यालयांनी विद्यालयांचे वर्ग घेण्यास विरोध केल्याने सरकारकडून दहावी आणि बारावीच्या वर्गांबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यातील काही भागात शिक्षण संस्थांकडून दहावी, बारावीच्या मुलांसाठी वर्ग घेतले जात आहेत. यापूर्वी सरकारने दहावीचे वर्ग घेण्यास मान्यता दिली नव्हती. तथापि, शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी मुलांना शाळेत येण्यास मान्यता देण्यात आली होती. राज्यातील काही भागात मोबाईल कनेक्टिविटीच्या समस्येमध्ये ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात.
मेळावलीत आयआयटी
प्रकल्प उभारणारच
शेळ-मेळावली गुळेली येथे आयआयटी संकुल उभारण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला आहे. त्या ठिकाणी सरकारच्या मालकीची १० लाख चौरस मीटर जमीन आहे. तेथील काही भागात काजूची झाडे आहेत. त्या भागाला भेट देऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. काजू बागायतदारांचे पुनर्वसन करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. आयआयटीला विरोध करणार्या नागरिकांशी चर्चा सुरू आहे. आयआयटी संकुलाला विरोध करणारे लोक माघार घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.
राज्यातील भाजप, कॉंग्रेस आणि इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून गुळेली येथील नियोजित आयआयटीच्या जागेचा फेरविचार करण्याची मागणी केली जात असली तरी मुख्यमंत्री डॉ. सावंत गुळेली येथेच आयआयटी संकुल उभारण्याच्या निर्णयावर ठाम आहे.