गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या दहावीच्या कोकणी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका असल्याने कोकणी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उत्तरे लिहिताना गोंधळ उडाला. त्यामुळे त्याचा परिणाम गुणांवर होणार असल्याची भीती पालकांनी शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनाकडे व्यक्त केली आहे. या प्रश्नपत्रिकेत तब्बल 26 चुका आढळून आल्या आहेत.
या प्रश्न पत्रिकेत अनुस्वार, ऱ्हस्व, दीर्घासहित अनेक चुका असून कोकणी शुद्धलेखनात कित्येक ठिकाणी अक्षम्य चुका केल्या आहेत. मंडळाकडे अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक असताना ह्या चुका पाहून बिगर कोकणी शिक्षकाला प्रश्नपत्रिका काढण्यास लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे शिक्षणमंत्री असून त्यांनी लक्ष घालावे अशी मागणी पालकांनी केली आहे.
काही ठिकाणी गोव्याच्या गावांच्या नावाचा अपभ्रंश केलेला दिसतो. या प्रश्नपत्रिकेत किमान 26 चुका आहेत. पहिल्याच प्रश्नांतील विधाने पूर्ण करणे यामध्ये तीन शुद्ध लेखनाच्या चुका आहेत. प्रश्न 2 मध्ये 45 ते 30 शब्दांत उत्तर देणाऱ्या प्रश्नांना 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची पद्धत असते; पण पर्याय दिलेला नाही. त्यातही बांयत (विहीर) ‘बोयत’ अशी चूक केली आहे. कवितेचा प्रश्न तिसरा असून जोड्या लावण्याऱ्या प्रश्नात ‘नुवे’ या जागी ‘लुवे’ तर रिकाम्या जागा भरा या प्रश्नात उत्तर देण्यात आले आहे. हा मोठा चमत्कार आहे. दीर्घोतरी प्रश्नामध्ये पर्याय द्यायचे असतात. पण यावेळी पूर्व सूचना न देता बदल केल्याने विद्यार्थी गोंधळले होते.
प्रश्न क्रमांक 6 मध्ये संवाद दिलेला असून त्यात आदे (ओद), घ्या (ह्या), आसा (आला) तर प्रश्न 7 मध्ये उताऱ्यातच चुका ठेवण्यात आल्या होत्या. पिर्ला (पिला), रिवणां (खिणां), भुयारां (भुरोंरा) अशा असंख्य चुका आहेत. पिर्ला व रिवणा या दोन गावांची नावे प्रश्नपत्रिकेत भलतीच आहेत. त्यावरून गोव्यातील गावांची नावे ठावूक नसलेला ‘पेपर सेटर’ नेमला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे 10-15 गुणांचे नुकसान होणार आहे. कोकणी ही गोव्याची मातृभाषा असून त्यासंबंधी मंडळाने खुलासा करून कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. पालकांनी काल विद्यालयात, वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींची भेट घेवून प्रश्नपत्रिकेतील चुका दाखविल्या. हा परीक्षा मंडळाचा सावळागोंधळ की पेपर सेटरची चूक याची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना 1 अतिरिक्त गुण मिळणार
दहावीच्या कोकणी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या छपाईच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त गुण देण्यात येणार असल्याचे काल गोवा शिक्षण मंडळाचे चेअरमन भगीरथ शेट्ये यांनी स्पष्ट केले. या प्रश्नपत्रिकेत केवळ एक चूक होती. ‘रिवण’ऐवजी ‘खिणा’ असा शब्द प्रश्नपत्रिकेत छापून आला होता. या चुकीमुळे छाननी समितीने विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त गुण देण्यात यावा, अशी शिफारस केली असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे विद्यार्थ्यांना 5 ते 10 गुणांना मुकावे लागेल असा जो दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे, त्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले.