दहशतवाद विरोधी विभागाला ३० गुप्त पोलिसांची साथ

0
97

पोलीस महानिरीक्षकांची माहिती
गोवा हे महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून सतर्कतेचेही आदेश येतात. या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद विरोधी पथक बळकट करण्याचा निर्णय घेऊन या विभागासाठीच काम करण्यासाठी ३० गुप्तचर पोलिसांची नियुक्ती केल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.यापूर्वी वरील गुप्तचर पोलीस अन्य कामेही करीत होते. सध्याच्या परिस्थितीत एटीएससाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र पध्दतीने काम करणार्‍या गुप्तचर पोलिसांची गरज निर्माण झाल्याचे गर्ग यांनी सांगितले. या पोलिसांना साध्या गणवेशात महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यकाळात कुठे काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काळजी घेतलीच पाहिजे. दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर आपण येथे बरेच बदल केल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष दर्शन चालू आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलिसांची गरज भासली. महाराष्ट्रातून पोलिसांच्या ३ कंपन्या आणल्याचे गर्ग यांनी सांगितले.
अवशेष दर्शनासाठी १७०० पोलीस काम करीत आहेत, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ६०० पोलीस काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. गोवा हे लहान राज्य आहे. त्यामुळे काही समाजकंटक येथे आसरा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांबरोबर समन्वयासाठी बैठकाही घेतल्याची माहिती त्यांनी दिली. सुरक्षेच्या बाबतीत शेजारच्या राज्यांची मदत घेणे महत्वाचे असते, असे ते म्हणाले.
भांडणे मिटवण्याचे काम
पती-पत्नीमधील भांडणांचे प्रमाण बरेच वाढले असून. सुशिक्षीत वर्गात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बिगर सरकारी संस्थांच्या मदतीने अशी प्रकरणे सोडविण्याचा पोलीस प्रयत्न करतात, असे पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
पोलिसांच्या हप्तेगिरीला महानिरीक्षकांकडून चाप
वरिष्ठांना हप्ते द्यायला हवेत असे सांगून काही पोलीस पर्यटक, रेस्टॉरंट मालक, कायदेशीर स्पा हॉटेल्स आदींकडून हप्ते गोळा करीत असल्याच्या तक्रारी आल्याने आपण या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. आपल्या खात्यात अनेक चांगले अधिकारी आहेत, परंतु खात्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी काही पोलीस पुरेसे आहेत. अशा पोलिसांवर गंभीर स्वरूपाची कारवाई होईल, याची काळजी घेतली आहे. कुणाकडुनही हप्ते गोळा करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांनी ७०३०१००००० या दक्षता विभागाच्या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन गर्ग यांनी केले आहे. वरील प्रकार डीआयजीच्या पातळीवरच हाताळ्यात येईल त्यामुळे तक्रारीसंबंधीच्या गुप्ततेच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. यापुढे साध्या गणवेशातील पोलिसांना वरिष्ठांच्या परवानगीनेच ठरावीक प्रकरण हाताळण्यासाठी जाण्याची मुभा असेल, असे सांगून साध्या गणवेशातील पोलिसांना परवानगीशिवाय कोणत्याही रेस्टॉरंट किंवा स्पामध्ये जाण्यास बंदी असेल, असे गर्ग यांनी सांगितले. आपण खात्यात शिस्त आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या कामात गेल्या ९ महिन्यांत राजकीय हस्तक्षेप झालेला नाही, असेही गर्ग यांनी सांगितले.