दहशतवाद्यांना पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
13

>> जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठकीत घेतला संपूर्ण परिस्थितीचा आढावा

देशात आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकांचे वातावरण शांत होताच दहशतवादी हल्ल्यांची मालिकाच पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी, कठुआ आणि डोडा येथे गेल्या चार दिवसांत चार दहशतवादी हल्ले झाले. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सुरक्षा यंत्रणांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दहशतवादविरोधी तमाम यंत्रणा तैनात करण्याचे आदेश दिले. तसेच पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि इतर यंत्रणांना दहशतवाद्यांना पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. आपल्यायाकडे जी काही संसाधने उपलब्ध आहेत, ती दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी वापरली जावीत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये त्यांना जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईची माहिती देण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील या एकापाठोपाठ घडणाऱ्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही चर्चा केली. परिस्थित नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करणे, तसेच दहशतवादविरोधी कारवाई करणाऱ्या अभियानांचाही त्यांनी आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी दहशतवाद विरोधी कारवाईसाठीची तमाम यंत्रणा तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला व स्थानिक प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला.

9 जूनपासून सुरु झालेली ही दहशतवादी घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नव्हती. काही दिवसांपूर्वी रियासी येथे बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, त्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यांवर पंतप्रधान मौन असल्याबद्दल काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले होते.