दहशतवादी अबू बकरच्या युएईत मुसक्या आवळल्या

0
14

>> १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी

परदेशातील एका मोहिमेत भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश आले असून, १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी दहशतवादी अबू बकर याला यूएईत अटक करण्यात आली आहे.

१९९३ साली मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी १२ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. तब्बल २५७ लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते, तर ७०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. तब्बल २९ वर्षांनंतर या हल्ल्यातील आरोपी अबू बकर हा भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्स आणि दाऊदसोबत दुबईतून कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या.

अबू बकर याचे पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख आहे. तो दाऊद इब्राहिमचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तो यूएई आणि पाकिस्तानात राहत होता. खरेतर २०१९ मध्येच त्याला अटक केली होती. मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकार्‍यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून, लवकरच भारतात आणले जाणार आहे. सध्या त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.