>> ऐतिहासिक भारत भेटीवर अमेरिकेच्या अध्यक्षांचे अभूतपूर्व स्वागत
अमेरिका भारताचा आदर करते, अमेरिकेचे भारतावर प्रेम आणि निष्ठा आहे. भारत आणि अमेरिका कट्टरपंथीय इस्लामी दहशतवादापासून आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहेत, असे भावनिक उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोतेरा स्टेडियमवर आयोजित भव्य अशा ‘नमस्ते ट्रम्प’ या सोहळ्यात बोलताना काढले. भारताबरोबरील संरक्षण विषयक संबंध अधिक दृढ करण्यासह अमेरिका भारताबरोबर उत्तम प्रकारच्या व्यापारी करारावरही काम करीत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी मेलनिया ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर होते.
एक लाखाहून अधिक क्षमतेच्या मोतेरा स्टेडियमवर उपस्थित विशाल समुदायासमोर बोलताना ट्रम्प यांनी भारताच्या वैयक्तिक स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, व्यक्तीची प्रतिष्ठा याबाबतच्या महान परंपरेचा उल्लेख केला.
दहशतवाद संपण्यासाठी
भारत-अमेरिका वचनबद्ध
भारत व अमेरिका दहशतवाद संपवण्यासाठी बचनबद्ध आहेत. त्यासाठीच माझे सरकार पाकिस्तानधील दहशतवादी टोळ्यांना उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तान सरकारबरोबर काम करीत आहे, असे ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पत्नी मेलानियासह त्यांच्या बाजूला कन्या इव्हांका, जावई जेर्ड कुशनेर हेही उपस्थित होते.
मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. ते म्हणाले, उभय देश सध्या परस्परांशी व्यापारी करारांवर काम करीत आहेत आणि मोदी हे अशा वाटाघाटींसाठी खमके आहेत. कठोर मेहनत घेतल्यास भारतीय माणूस किती उत्तुंग झेप घेऊ शकतो याचे मोदी हे जितेजागते उदाहरण आहे.
सांस्कृतिक वैविध्याचा उल्लेख
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारताचा सांस्कृतिक वैविध्याचाही उल्लेख केला. बॉलिवूड चित्रपटांबरोबरच सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या क्रीडा महानतेलाही त्यांनी स्पर्श केला.
अमेरिका नेहमी भारताचा
निष्ठावान मित्र राहील
त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे गळाभेट घेऊन खास शैलीने स्वागत केले. ट्रम्प पुढे म्हणाले, की अमेरिका सदैव भारताचा निष्ठावान मित्र राहील.तसेच पंतप्रधान मोदी यांचा गौरव करताना त्यांचा उल्लेख देशासाठी अहोरात्र काम करणारा आगळा नेता असा केला.
आज ३ अब्ज डॉलरचा
संरक्षणविषयक करार
भारत-अमेरिका यांच्यात आज मंगळवारी ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षणविषयक करार करण्यात येईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केली. अमेरिका भारताचा या क्षेत्रातील एक प्रमुख भागीदार म्हणून काम करील, असेही ते म्हणाले. भारत-अमेरिकेची मैत्री नैसर्गीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व भव्य स्वागताबद्दल भारताला धन्यवाद देत असल्याचे सांगितले.
ट्रम्प यांच्यासाठी आज राष्ट्रपती भवनात सोहळा
जगातील सर्वात भव्य मोतेरा स्टेडियमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ सोहळा, साबरमती आश्रमातील ट्रम्प दांपत्याकडून सूतकताईची माहिती, त्याआधीचा विमानतळापासूनचा रोड शो आणि जगप्रसिद्ध ताज महाल दर्शन अशा कालच्या भरगच्च कार्यक्रमानंतर आज मंगळवारी अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारत भेटीचा केंद्रबिंदू ठरणार आहे राजधानातील राष्ट्रपती भवन.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक भारत दौर्याचा कळस राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात गाठला जाणार आहे. राष्ट्रपती भवनातील हा सोहळा उच्चस्तरीय राजनैतिक पातळीवरील महत्त्वपूर्ण कार्यक्रम असल्याचे नेदरलँडमधील भारताचे राजदूत वेणू राजामोनी यांनी सांगितले. राजामोनी यांनी याआधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे माध्यम सचिव म्हणून २०१५ साली बराक ओबामा यांच्या भारत भेटीवेळी काम पाहिले होते. राष्ट्रपती भवनात आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांची पत्नी मेलनिया यांच्या सन्मानार्थ स्वागत सोहळा आयोजिणार आहेत. यावेळी राष्ट्रपतींसमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद याही उपस्थित असतील. या सोहळ्यानंतर संध्याकाळी होणार्या मेजवानीने ट्रम्प यांच्या भारत भेटीचा औपचारिक समारोप होणार आहे.