येणारा प्रजासत्ताक दिन आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या गाझीपूर फूलमंडीमध्ये काल सापडलेली स्फोटके ही चिंतेची बाब आहे. देशामध्ये येत्या प्रजासत्ताक दिन व निवडणुकांच्या तोंडावर घातपात घडविला जाऊ शकतो असा इशारा गेल्या सात तारखेला गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर लागोपाठ राजधानी दिल्लीच्या गजबजल्या बाजारपेठेत स्फोटके सापडणे ही साधी गोष्ट नाही. तेथे आरडीएक्ससारखे घातक स्फोटक सापडल्याची माहिती एनएसजीच्या प्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे येणार्या काळात देशात अधिक सुरक्षात्मक खबरदारी घेतली जाण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. सरकार आणि जनतेचे अवघे लक्ष सध्या ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाकडे आहे. त्यामुळे सुरक्षेत ढिलाई उरू नये याकडे आता कसोशीने लक्ष द्यावे लागेल.
निवडणुकांचा काळ असल्याने सर्वत्र राजकीय पक्षांच्या प्रचारसभांचा धडाका लवकरच उडेल. सध्या निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत कोरोनामुळे सभा, रोड शो, आंदोलने यांना बंदी घातलेली असल्याने सारी सामसूम आहे. कदाचित ही मुदत वाढवण्याची पाळीही येऊ शकते. परंतु तरीही उपस्थितीवर निर्बंध घालून, सामाजिक अंतर पाळून जाहीर सभांचे आयोजन करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली, तर प्रमुख राजकीय नेत्यांच्या या सभांमध्ये काही घातपात होणार नाही हे पाहण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना डोळ्यांत तेल घालून दक्ष राहावे लागेल.
दहशतवादी संघटनांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याने आणि पाठीराख्या पाकिस्तानला बालाकोटच्या कारवाईने धाक बसवल्याने देशामध्ये बर्याच काळापासून घातपाती कारवाया करण्याची हिंमत काश्मीर आणि ईशान्येकडील प्रदेश वगळता अन्यत्र कोणी केलेली नाही. परंतु राजधानी दिल्लीच्या गजबजल्या बाजारपेठेत आरडीएक्स सारखी घातक स्फोटके आढळतात याचा अर्थ कोणी तरी काही तरी बेत शिजवते आहे असा होतो. त्यामुळे अशा दहशतवादी शक्तींना डोके वर काढण्याची संधी मिळू नये यासाठी व्यापक कारवाईची मोहीम सुरक्षा यंत्रणांना आखावी लागेल.
निवडणुका तोंडावर असल्याने अशा प्रकारच्या घातपाती कारवायांच्या शक्यतेला एकीकडे राजकीय स्टंटबाजी म्हणून उडवून लावले जाण्याचीही शक्यता आहे, तर दुसरीकडे, निवडणुका तोंडावर येतात आणि सत्ताधारी पक्ष त्या हरण्याची शक्यता असते तेव्हा जनतेचे लक्ष सरकारच्या ‘कर्तबगारी’कडे वेधण्यासाठी आणि त्याद्वारे मते आकृष्ट करण्यासाठी चमकदार कृत्ये करण्याचेही एक राजकीय तंत्र असते. येथे या दोन्ही गोष्टी नसतील असे आपण मानूयात.
पंजाबमध्ये अलीकडेच पंतप्रधानांच्या दौर्यावेळी त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी गंभीर त्रुटी आढळली. पंतप्रधान हा देशाचा नेता असतो. कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हे. अशा संवैधानिक पदावरील व्यक्तीची सुरक्षा ही परमोच्च महत्त्वाची असते आणि असायलाच हवी. आपल्या देशाने तीन पंतप्रधान घातपातामध्ये गमावले आहेत हे कदापि विसरले जाऊ शकत नाही. वास्तविक पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीचे कोणत्याही प्रकारे राजकारण व्हायला नको होते. परंतु दुर्दैवाने त्याचा राजकीय फायद्यासाठी दोन्ही बाजूंकडून वापर करून घेण्यात आला. पंजाब विधानसभेच्या निवडणुका गोव्याबरोबरच होणार आहेत. त्यामुळे तेथील सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यासाठी आणि मोदींच्या नावाने सहानुभूती मिळवण्यासाठी हा विषय देशभरातील मतदारांपर्यंत प्रकर्षाने पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. त्रुटी कशी राहिली याची चौकशी आणि त्यावरील तत्पर कारवाई करण्यासाठी हा विषय सर्वोच्च न्यायालयाने विचाराधीन घेतलेला असल्यामुळे तो तेथेच संपायला हवा होता, परंतु येत्या निवडणूक प्रचारामध्ये हा विषय पुढे आणण्याचा आणि अतिरंजित स्वरूपात मतदारांपुढे ठेवण्याचा आटापिटाही होऊ शकतो.
काश्मीरच्या विशेषाधिकारांच्या उच्चाटनानंतर तेथे दहशतवादी कारवायांत स्थानिक सहभाग वाढविण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रविरोधी शक्तींकडून चाललेला आहे. दुसरीकडे, पंजाबात सुवर्णमंदिरातील आणि इतर गुरुद्वार्यांतील पवित्र वस्तूंची बेअदबी करून धार्मिक दंगे घडवण्याचा प्रयत्नही मध्यंतरी झाला. खलिस्तानवादी शक्ती पुन्हा डोके वर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मध्य भारतात नक्षलवादीही अधूनमधून डोेके वर काढत असतात. ईशान्येमध्ये काही राज्यांत बंडखोरी उफाळू लागली आहे. हे लोण आता राजधानीपर्यंत आणि निवडणुका होणार असलेल्या राज्यांपर्यंत येणार नाही याची दक्षता घेतली जावी हीच जनतेची अपेक्षा आहे.