देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना बंगळुरूमध्ये एका उपाहारगृहामध्ये झालेला बॉम्बस्फोटाद्वारे दहशतवादाने पुन्हा एकवार दक्षिण भारताचे दार ठोठावले आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याने त्यामध्ये प्राणहानी जरी झालेली नसली, तरी एकंदर ह्या बॉम्बमध्ये वापरली गेलेली स्फोटके, अधिक हानी पोहोचवण्यासाठी त्यात ठेवले गेलेले नटबोल्ट, सामान्य घड्याळाऐवजी वापरला गेलेला विशिष्ट प्रकारचा टायमर, डिटोनेटर वगैरे सर्व पाहिल्यास हा स्फोट व्यावसायिक हेव्यादाव्यांऐवजी दहशतवादी कारवाईकडेच निर्देश करतो. त्यामुळे काल हे स्फोट प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेने आपल्या हाती घेतले आहे. ह्या स्फोटातून एक प्रकारे दहशतवादी शक्तींनी देशाला ललकारले आहे. सार्वत्रिक निवडणुकांचा मोसम येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर ह्या घटनेचे गांभीर्य कितीतरी पटींनी वाढते. ही एखाद्या मोठ्या कटाची रंगीत तालीम तर नसेल ना अशी भीती त्यामुळे व्यक्त होऊ लागली आहे आणि ती अनाठायी नाही. अलीकडच्या वर्षांमध्ये दक्षिण भारत हे जिहादी दहशतवादाचे आश्रयस्थान बनत चालले आहे. काही वर्षांपूर्वी कोईम्बतूरमध्ये, नंतर मंगळुरूमध्ये अशाच प्रकारचे कमी तीव्रतेचे, परंतु प्राणघातक बॉम्बस्फोट घडले होते. मंगळुरूमध्ये पुन्हा एकवार घातपात घडवण्यासाठी रिक्षातून चाललेला एकजण वाटेतच स्फोट झाल्याने स्वतःच जखमी झाला होता. बंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या स्फोटाचे मंगळुरूमधील पूर्वीच्या स्फोटांशी बरेच साम्य आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. कूकरमध्ये स्फोटके ठेवणे, एकाच प्रकारचे आयईडी आणि डिटोनेटर वापरणे, एकाच प्रकारे जोडणी करणे हे सगळे एखाद्या दहशतवादी संघटनेचा ह्या साऱ्या स्फोटांत हात असल्याचे सूचित करते आणि ते खरे असेल तर ही खूप चिंतेची बाब ठरते. मंगळुरूमधील दोन वर्षांपूर्वीच्या स्फोटामागे ‘अल हिंद’ नावाची एक नव्याने उदयाला आलेली दहशतवादी संघटना असल्याचे उघडकीस आले होते. कर्नाटकात काही ठिकाणी छापे मारून मग अनेक हस्तकांना पकडण्यात आले. त्यानंतर काही काळ शांतता होती. परंतु आता निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादाने पुन्हा डोके वर काढलेले दिसते. मंगळुरू स्फोटप्रकरणातील चार आरोपी अद्याप फरार आहेत. त्यातला एकजण त्या कटकारस्थानाचा पर्दाफाश होण्यापूर्वीच दुबईला पळून गेला होता. त्याचा आजतागायत ठावठिकाणा लागलेला नाही. नंतर छाप्यांमध्ये काहीजण पकडले गेले, परंतु त्यांचे म्होरके हाती लागलेले नाहीत. त्यामुळे बंगळुरूच्या स्फोटामागे नेमके कोण आहे ह्याचा शोध घेणे नितांत जरूरी आहे. मध्यंतरी इस्लामिक रेझिस्टन्स कौन्सिल नावाची एक नवी दहशतवादी संघटना दक्षिण भारतातच उदयाला आलेली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादाविरुद्ध देशभरात खमकी पावले उचललेली आहेत आणि ठिकठिकाणी सातत्याने छापे टाकले जात असतात. दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात, त्यांची मॉड्यूल्स उद्ध्वस्त केली जातात. परंतु तरीही नवनवे गट जिहादी घातपाती कारवायांसाठी पुढे येताना दिसतात. बंगळुरूमधील प्रस्तुत बॉम्बस्फोट घडवणारी व्यक्ती टोपी आणि मास्क लावून साळसूदपणे बसमधून आली, सराईतपणे उपाहारगृहात गेली, आरामात तेथे रवा इडली खाल्ली, वॉश बेसिनजवळ जाऊन तेथे स्फोटके ठेवून हलकेच बाहेर पडली. अवघ्या नऊ मिनिटांमध्ये स्फोटके ठेवण्याचे हे काम त्या माणसाने उरकले आणि पदपथांवरील सीसीटीव्हींची नजर चुकवण्यासाठी रस्त्यावरून चालता झाला. म्हणजेच सुनियोजितपणे हा स्फोट घडवला गेला असे दिसते. त्या व्यक्तीची जी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाली आहे, त्यामध्ये तिचा चेहरा काही प्रमाणात दिसतो. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तिचा माग काढण्याची धडपड बंगळुरू पोलिसांनी चालवली आहे. एका फुटेजमध्ये हा माणूस मोबाईलवर बोलतानाही आढळला आहे. त्यामुळे त्या मोबाईल टॉवरवरून त्यावेळी झालेली मोबाईलवरील संभाषणेही तपासली जात आहेत. ह्या सगळ्या प्रयत्नांतून हा संशयित लवकरच सापडेल अशी आशा आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत अज्ञातांकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. म्हणजेच कोणीतरी दक्षिणी राज्यांमध्ये अल्पसंख्यक समुदायाला चिथावणी देण्याचे काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. धार्मिक उन्मादाला चालना देऊ पाहते आहे. निवडणुकीसाठी ध्रुवीकरण घडवू पाहते आहे. परंतु हे कटकारस्थान लवकरच उजेडात येईल अशी अपेक्षा करूया. ते वेळीच उजेडात येणे जरूरीचे आहे, कारण काट्याचा नायटा होण्यापेक्षा वेळीच त्याची पाळेमुळे उखाडली गेली तरच त्याचा उपयोग होत असतो.