कोकणच्या दशावतारी नाट्य कलेतील ‘लोकराजा’ म्हणून नावलौकिक मिळविलेले कुडाळ तालुक्यातील शिरसोसवाडी-नेरुर येथील रहिवासी ज्येष्ठ दशावतारी कलावंत, श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुरचे मालक शिवराम उर्फ सुधीर महादेव कलिंगण (वय ५१) यांचे काल पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांच्यावर गोवा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने दशावतारी लोककलेची मोठी हानी झाली आहे.
दशावतार क्षेत्रातील प्रसिद्ध लोककलाकार महादेव उर्फ बाबी कलिंगण यांचा वारसा त्यांचे सुपुत्र सुधीर कलिंगण यांनी पुढे चालू ठेवला होता. दशावतार लोककला साता समुद्रापार नेण्यात त्यांचा वाटा होता. आतापर्यंत त्यांनी सिंधुदुर्ग, मुंबईसह गोवा राज्यात दशावतारी कला सादर करीत नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.