दवाखाने उघडण्यावर नियंत्रणासाठी लवकरच कायदा

0
223

राज्यभरात मिळेल तेथे कुणीही क्लिनिक्स उघडण्याचे जे प्रकार चालू आहेत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार लवकरच ‘क्लिनिकल एक्स्टाब्लिशमेन्ट ऍक्ट’ अमलात आणणार असल्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
परराज्यातून व विदेशातूनही आलेल्या काही तथाकथित दंत चिकित्सकांनी गोव्यातील विविध भागांत व विशेष करून किनारपट्टी भागांत आपले दवाखाने सुरू केलेले आहेत. ते राज्याबाहेरून आलेले असल्याने ते खरोखरच दंत तज्ज्ञ आहेत की काय, त्यांच्याकडे दंत शिक्षणाची पदवी आहे की काय हे रुग्णांना कळण्यास मार्ग नसल्याचे यावेळी सरदेसाई यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. तसेच या तथाकथित डॉक्टरांवर लक्ष ठेवण्याची सभागृहात मागणी केली.
यावेळी उत्तर देताना पार्सेकर म्हणाले की, अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार ‘क्लिनिकल एक्स्टाब्लिशमेंट ऍक्ट’ तयार करणार आहे. हा कायदा विधानसभेत संमत केल्यानंतर दवाखाना उघडण्यावर नियंत्रण येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्षात डॉक्टर नसलेले लोकही दवाखाने उघडत असतात असे सांगून अशा बनावट डॉक्टरांवर कारवाई होण्याची गरज यावेळी आमदार रोहन खंवटे यांनी व्यक्त केली.