केरी सत्तरी येथील विवेकानंद कला साहित्य संस्कृती अभिवृध्दी मंचतर्फे गोवा सरकारच्या कला संस्कृती खाते आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु शिष्य परंपरेअंतर्गत दवले माणीच्या गायन आणि वादनाच्या परंपरेला संवर्धनासाठी आणि संरक्षण देण्याच्या हेतूने विशेष प्रयत्न केले आहेत.
कला संस्कृती खात्याने उप संचालक अशेक परब आणि संचालक प्रसाद लोलयेकर यांच्या संकल्पनेतून खात्याने अधिकारी मिलींद माटे यांच्या देखरेखीखाली सदर दवले माणीच्या वादनाची परंपरा टिकवण्याचा प्रयत्न केरी सत्तरीत चालू आहे.
लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार सुभद्रा अर्जून गावस अणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांनी निवडक युवा कलाकारांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले आहे.
दवले माणीच्या वादनाची परंपरा पोर्तूगीजपूर्व काळापासून गोव्यात असून भूपाळी गायनासारखी ही परंपरा असली तरी लोकदैवताच्या गुणगौरव आणि भक्तीप्रित्यर्थ गायली जाणार्या या परंपरेस दवली आणि माण यांचा लोकवादन म्हणून वापर केला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा स्टीलची भांडी वापरली जात नव्हती, तेव्हा करवंटीपासून तयार केलेला ‘दवला’ चमच्यासारखा वापरला जात असे. नाचणीच्या भाकरीचे पीठ मळण्यासाठी फणसांच्या लाकडापासून माण तयार केली जायची. गणेश चतुर्थीत भाकरी भाजण्याला विश्रांती देऊन सत्तरी, डिचोली, पेडणे, महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील महिला दवले आणि माणीच्या लोकवाद्य म्हणून वापर करत पारंपारिक लोकगीतांच्या अर्थपूर्व ओळीवरती हे गायन अधिकाधिक रंगतदार करतात. स्नेहा गावस पारोडकर या विद्यार्थीनीच्या मते पदव्यूतर शिक्षण घेतलेले असताना आपल्या पूर्वजांची परंपरा जाणून घेण्याच्या हेतूने आपण शिक्षण पत्करलेले असून पारंपारिक गाणी आणि दवले माणीचे वादन याद्वारे आम्हाला वेगळ्या विश्वात जाण्याचा आनंद प्राप्त होत आहे.