दरड कोसळून महामार्ग पूर्णत: बंद

0
8

>> गेल्या 20 दिवसांत मालपे येथे तिसऱ्यांदा कोसळली दरड

मालपे येथे राष्ट्रीय महामार्गालगतची दरड कोसळण्याचे सत्र सुरुच असून, गेल्या जवळपास 20 दिवसांत तिसऱ्यांदा याच ठिकाणी काल पुन्हा एकदा दरड कोसळली. पहिल्यांदा दरड कोसळल्यानंतर एका बाजूची मार्गिका बंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या बाजूची दरड कोसळली आणि या मार्गावरील वाहतूकच जुन्या मार्गाने वळवण्यात आली. त्यानंतर काल दुपारी पुन्हा एकदा दरड कोसळून संपूर्ण महामार्गच बंद झाला.

7 जुलैच्या रात्री या ठिकाणी दरड कोसळल्यानंतर या मार्गावरील वाहतूक जुन्या रस्त्याने वळवण्यात आली होती. अन्यथा या मार्गावरील वाहतूक सुरुच राहिली असती, तर काल मोठा अनर्थ घडला असता. त्याआधी 22 जून रोजी मालपे ते पणजीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील दरड कोसळली होती.
मालपे येथे महामार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी चुकीच्या पद्धतीने डोंगर कापणी करण्यात आल्याने, तसेच डोंगर कापणी करण्यात आलेल्या जागी निकृष्ट दर्जाची संरक्षक भिंत बांधण्यात आल्याने तेथे दरड कोसळण्याची घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून होऊ लागला आहे.

पुन्हा पुन्हा या महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्याने विरोधी काँग्रेस पक्षाने महामार्गाच्या बांधकामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला असून, यासंबंधी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार दि. 11 जुलै रोजी जेव्हा गोव्यात येतील, तेव्हा त्यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.