दया, करुणा, शांती तेथे देवाची वस्ती

0
14

योगसाधना- 630, अंतरंगयोग-216

  • डॉ. सीताकांत घाणेकर

सगळे वातावरण अगदी शांतीचे, आनंदाचे असते. खरे म्हणजे हे सगळे उत्सव मानवाला काही विशिष्ट तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी साजरे केले जातात. प्रत्येक गोष्टीमागे व कर्मकांडामागे एक विशिष्ट हेतू असतो. तो आपण समजून घेणे आवश्यक असते.

भगवंताने अत्यंत परिश्रमाने एक सुंदर विश्व निर्माण केले. त्याला आकर्षक सृष्टीने, निसर्गाने नटवले. पंचमहाभूते कार्यरत झाली- धरती, जल, वायू, अग्नी, आकाश. या सृष्टीमध्ये डोंगर, पर्वत, नाले, नद्या, वृक्षवनस्पती निर्माण केली. फुलाफळांनी शोभा आणखी वाढवली. त्याचबरोबर जीवसृष्टीदेखील आली- जीवजंतू, कृमीकिटक, पशू, पक्षी, प्राणी… या प्राण्यांमधला उच्च बुद्धीचा भगवंताचा लाडका पुत्र म्हणजे मानव!

देवाने मानवाला विविध तऱ्हेचे ज्ञान दिले. सृष्टी प्रेमाने, आपुलकीने सांभाळण्यासाठी तल्लख बुद्धी दिली. नैसर्गिक प्रजोत्पादनाची क्षमता असल्यामुळे लोकसंख्या वाढत गेली. सृष्टीच्या आरंभाला मानव आपल्या दैवीसंस्कारांप्रमाणे विश्वात वावरत होता. देवदेवतांसारखा पवित्र, सात्त्विक, नीतिमान होता. परमेश्वर आपल्या माता-पित्यासारखा आहे. त्याचे गुण मानवातदेखील आहेत याची त्याला जाणीव होती. हे गुण म्हणजे- ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सुख, आनंद, शक्ती. सगळ्या सृष्टीत सुख-शांती-आनंद होता. सगळे सुरळीत चालले होते. याला ‘सत्‌‍युग’ म्हणून उपाधी मिळाली.

परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे मानवाच्या सद्सद्विवेकबुद्धीवर मायेचा पगडा हळूहळू बसायला लागला. षड्रिपू- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार या राक्षसी संस्कारांनी त्याची बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली. तो स्वार्थी, आत्मकेंद्री व्हायला लागला. जसजसा या नकारात्मक संस्कारांचा प्रभाव वाढू लागला, तसतसे युगदेखील बदलायला लागले. त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग… आणि आता तर ‘घोर कलियुग!’

हे नकारात्मक घडलेले परिवर्तन असह्य झाले तेव्हा भगवंताने अनेक संत-महापुरुषांना योग्य ज्ञान देऊन सामान्य माणसांमध्ये पाठवले. कदाचित अपेक्षित परिणाम न दिसल्यामुळे भारतात अवतार घेतले. त्यातील काही मानवरूपात- वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध- पृथ्वीवर पाठवले. मध्ये मध्ये इतर देशांतदेखील प्रेषित पाठवले- येशू ख्रिस्त, महावीर वगैरे… यांतील येशू ख्रिस्त जेरुसलेममधील बेतलेहॅम या गावात जन्माला आले. त्याचे आईवडील होते मेरी आणि जोसेफ.

श्रीकृष्णाचा जन्म जसा तुरुंगात झाला तसा येशूचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला. या दैवीपुरुषांचे सर्वकाही वेगळेच असते. आम्हा सामान्यांच्या समजुती पलीकडले. ख्रिस्ताचा जन्म हा सर्व विश्वात ‘ख्रिसमस’ म्हणून साजरा केला जातो. आम्ही त्याला ‘नाताळ’देखील म्हणतो. हा प्रेषित प्रेमाचा संदेश घेऊन जन्माला आला. तो म्हणत असे- ‘देव म्हणजे सत्य व प्रेम!’
इतिहासकार लिहितात की त्यावेळी आकाशात एक तेजस्वी तारा चमकत होता, जणू काही एका महापुरुषाच्या आगमनाची बातमी देत होता. विश्वात विविध धर्म आहेत. प्रत्येक धर्मात काही विशिष्ट उत्सव असतात. वेगवेगळ्या तऱ्हेने ते मनवले जातात. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री म्हणून त्यावेळी ख्रिश्चन समूदाय चॅपेल-चर्च या त्यांच्या धार्मिकस्थळी जातात. छान छान भक्तीसंगीत म्हणतात व जन्मदिन एकत्र साजरा करतात. एकमेकांना प्रेमाने शुभेच्छा देतात. विविध तऱ्हेची मिठाई वाटतात. सगळीकडे आनंदी आनंद असतो.
येशूचा जन्म गायीच्या गोठ्यात झाला होता म्हणून कुटुंबातील लहानमोठे एकत्र येऊन गोठा बनवतात. त्यात गवत घालतात, खेळण्यातील गाई ठेवतात. सगळीकडे छान रोषणाई करतात. प्रत्येक घरात ताऱ्याचा आकाशदिवा बनवतात. त्यामुळे चोहीकडे झगमगाट होतो. यामागचा भाव म्हणजे येशूच्या जन्माच्या दिवशी तेजस्वी तारा दिसला होता त्याची आठवण.

त्याशिवाय प्रत्येकाच्या घरी ख्रिसमसचा एक वृक्ष असतो. त्यालादेखील चांगले सजवतात. त्याच्या फांद्यांना लहान मुलांना देण्यासाठी छान छान भेटवस्तू बांधतात. तसेच त्याच्यावर रंगीबेरंगी दिवे पेटवतात. त्याचबरोबर छोट्या-छोट्या सफेद पऱ्या तयार करतात अथवा रंगवतात. या उत्सवात आणखी एक लहान मुलांचे अत्यंत लाडके असे व्यक्तिमत्त्व असते ते म्हणजे ‘सांताक्लॉज’ अथवा ‘फादर ख्रिसमस.’ मुले आपल्याला कसली वस्तू पाहिजे ते एका चिठ्ठीवर लिहून झोपतात. मध्यरात्री म्हणे सफेद दाढी असलेला वृद्ध सांताक्लॉज त्या मुलाजवळ त्याची भेटवस्तू ठेवून जातो. बालपणातील हा भाव अत्यंत नाजूक व सूक्ष्म असतो. हा सांताक्लॉज गुप्त रूपात वावरतो, तो कुणालाही दिसत नाही. दिवसभर लोक नातेवाइकांकडे, मित्रांकडे जातात. त्यांना मिठाई देतात व स्वतः घेतात. तरुण-तरुणी छान गाणी म्हणत आपल्या गावात फिरतात. त्याला ‘कॅरोल्स’ असे गोंडस नाव आहे. ही भक्तिगीते वेगवेगळ्या भाषेत असतात.
सारांश, सगळे वातावरण अगदी शांतीचे, आनंदाचे असते. खरे म्हणजे हे सगळे उत्सव मानवाला काही विशिष्ट तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी साजरे केले जातात. प्रत्येक गोष्टीमागे व कर्मकांडामागे एक विशिष्ट हेतू असतो. तो आपण समजून घेणे आवश्यक असते.

येशू ख्रिस्त ः हा प्रेम, शांती, दया, करुणा, माफी यांचे प्रतीक आहे. जीवनात अनेक व्यक्तींनी त्याचा विविध तऱ्हेने छळ केला. शेवटी त्याचाच ‘क्रॉस’ त्याला उचलून घेऊन चालायला लावले व क्रूसावर त्याच्या हातापायांना खिळे ठोकले.
‘गूड फ्रायडे’ या दिवशी चर्चमध्ये ही सर्व गोष्ट सांगितली जाते व हुबेहूब उभी केली जाते. ते दृश्य बघितले तर डोळ्यांतील अश्रू आवरत नाहीत. हृदय करुणेने भरून जाते.
येथे मुख्य मुद्दा म्हणजे क्रूसावर टांगल्यावरदेखील येशू आकाशाकडे बघून अगदी शांतपणे म्हणतो- ‘हे देवा, यांना क्षमा कर. कारण ते काय करतात ते त्यांनाच माहीत नाही!’
खरेच, क्षमेची ही परिसीमा आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक वेदना असतानादेखील येशू शांत होता. कदाचित म्हणूनच भगवंताला वाटले असेल की त्याच्या नावाने एक नवा धर्म- ख्रिस्तधर्म- जगाला मिळावा.
सफेद पऱ्या ः या पवित्रतेचे प्रतीक. यांना देवदूत मानले जाते. त्या सतत उडतच असतात. कारण त्या हलक्या असतात. आपल्यासारखे त्यांच्यात नकारात्मक भाव नसतात.

सांताक्लॉ ः हा भगवंताचा दूत. सर्वांना आवडीच्या देणग्या देणारा- अगदी नकळत- दृष्टीस न पडता- कसलाही गाजावाजा न करता.
चमकता तारा ः हा तारा म्हणजे प्रकाशाचे प्रतीक, ज्योतीचे प्रतीक.
ख्रिसमस वृक्ष ः याला विविध भाग आहेत. एक बुंधा- एकच धर्म- मानवतेचा.
फांद्या ः मोठ्या व नंतर छोट्या- विविध धर्म, संप्रदाय व नंतर त्यांचे उपविभाग.
पाने ः आत्मे.
एक गोष्ट मुद्दाम लक्षात घ्यायला हवी की, खरा धर्म एकच- मानवतेचा. त्यातील मुख्य तत्त्व म्हणजे- प्रेम, सत्य, शांती, क्षमा, दया, करुणा. प्रत्येक धर्मसंस्थापकाने तेच तत्त्वज्ञान सांगितले आहे. पण त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास न करता आपण फक्त कर्मकांडातच गुंतलो आहोत. विपरित ज्ञानामुळे एकमेकांकडे भांडण, लढाया करतो आहोत.
ज्या गावात ख्रिस्तजन्म झाला- बेतलेहॅम- तिथे कशा भयानक लढाया चालू आहेत (इस्रायल व हमास यांच्यामध्ये) हे सर्वांना माहीत आहे. तिथे मानवतेवर भयानक अत्याचार चालू आहेत. कुटुंबाची कुटुंबे- लहान मुलेदेखील- रोज मरणोन्मुखी पडताहेत आणि आपण शांती, प्रेमाच्या गोष्टी करत आहोत. जागतिक योगदिन 21 जून- एकत्रित संयुक्त राष्ट्रसंघ याची घोषणादेखील आहे- ‘सहयोग व शांतीसाठी योग!’
आता नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. भगवंताकडे आम्ही शांतिप्रिय साधक प्रार्थना करूया की जगात विश्वशांती येऊ दे. त्याचप्रमाणे प्रामाणिक अथक प्रयत्न करूया. ख्रिस्ताला हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
आम्हीदेखील त्या महापुरुषाकडून प्रेरणा घेऊन ‘भगवंताचा मुलगा’ होऊया.
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्माकुमारी, माऊंट अबू)