माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय काल घेतला. त्यांनी पर्वरीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र आपणाला कोरोनाची लागण झाली असून, आपण सध्या विलगीकरणात आहे. त्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे त्यांनी काल स्पष्ट केले.
नार्वेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच कॉंग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. कॉंग्रेस पक्ष राज्यात संपल्यात जमा असल्याचे वक्तव्य करत त्यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. आपणाला पर्वरीतून आपची उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांना होती; मात्र आपने पर्वरीतून रितेश चोडणकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या नार्वेकर यांनी आपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी पर्वरीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र काल त्यांनी कोरोनाचे कारण पुढे करीत माघार घेतली आहे.