सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोवा क्रिकेट असोसिएशनमधील (जीसीए) घोटाळाप्रकरणी असोसिएशनचे माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, विनोद फडके, अकबर मुल्ला यांची ४.१३ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. भारतीय क्रिकेट नियमन मंडळाकडून (बीसीसीआय) मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका या चौघांवर ठेवण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून जीसीएला मिळालेल्या निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने मनी लॉंडरिंग ऍक्ट २००२ अंतर्गत चौकशी सुरू केली होती. बीसीसीआयकडून मिळालेले अनुदान गोवा क्रिकेट असोसिएशनच्या तत्कालीन पदाधिकार्यांनी बेकायदारित्या परस्पर वटविल्याचा आरोप आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००६ – ०७ मध्ये जीसीएला अनुदान व टीव्ही सबसिडीसाठी ६.९५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यांपैकी ३.८७ कोटी रुपयांच्या निधीमध्ये घोटाळा करण्यात आल्याची तक्रार आहे. माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांनी डेव्हलपमेंट क्रेडीट बँक – पणजी आणि शिरोडा अर्बन को.-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी, आयडीसी कुंडई शाखा फोंडा येथे खाती उघडून धनादेश वटविल्याचा आरोप आहे. जीसीएच्या नावाने बँकांत बोगस खाते उघडून जीसीएचा निधी हडप करण्यात आल्याची तक्रार आहे. बीसीसीआयकडून मिळालेला निधी सदर खात्यात जमा करण्यात येत होता.
बीसीसीआयकडून मिळालेला निधी आणि बँकांत उघडण्यात आलेल्या नवीन खात्याबाबत माहिती जीसीएची मासिक बैठक किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली नाही. या बँकांतील खात्यात जमा झालेली रक्कम बॅरर धनादेशाचा वापर करून रोख स्वरूपात काढण्यात येत होती. पदाधिकार्याकडून बँकांच्या अधिकार्यांना दूरध्वनीवरून आपला माणूस पैसे काढण्यासाठी येत असल्याची माहिती दिली जात होती. तसेच पैसे त्वरित देण्याची सूचना संबंधितांना दिली जात होती.
सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या चौकशीनंतर याप्रकरणी ४.१३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दयानंद नार्वेकर यांचा करंजाळे येथील ३२४ चौरस मीटरचा अपार्टमेंट, चेतन देसाई यांची वास्को शहरातील १२४ चौरस मीटरची तीन दुकाने, विनोद फडके यांचा रेईश मागूश येथील ६६९७ चौरस मीटरचा प्लॉट, अकबर मुल्ला यांचे शिरोडा येथील ३००० चौरस मीटरचे दोन प्लॉट आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या फोंडा शाखेतील ६७.५०० रुपयांची कायम ठेव ताब्यात घेण्यात आली आहे.