दक्षिण भारतात आज-उद्या पावसाची शक्यता

0
6

>> हवामान खात्याने वर्तवला अंदाज

>> राजस्थान, हरियाणात पारा 47 अंशांवर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज गुरूवारी केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये पुढील 2-3 दिवसांत 12 सेमीपर्यंत पाऊस पडू शकतो. बिहार, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट अपेक्षित असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले.

राजस्थान, हरियाणात उष्णतेचा पारा चढाच
राजस्थान आणि हरियाणामध्ये पारा 47 अंशांच्या पुढे गेला आहे. हरियाणातील सिरसा येथे कमाल तापमान 47.8 अंश आणि राजस्थानच्या पिलानी येथे 47.2 अंश होते. हवामान खात्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने राजस्थानमध्ये पुढील 5 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसवरून 47 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील पाच दिवस उत्तर प्रदेशात रेड तर मध्य प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा असेल.

बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा

या वर्षातील पहिल्या चक्रीवादळाची शक्यता

नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून 24 मे 2024 च्या आसपास त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.
उत्तर हिंद महासागर खोऱ्यात विकसित होणारे हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ ठरणार आहे. या चक्रीवादळ उत्तर पूर्वेच्या दिशेने सरकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चक्रीवादळाचा मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वादळाने भारतीय किनारपट्टीवर धडक दिली तर मान्सूनच्या प्रारंभास मदत करू शकेल. याउलट, म्यानमारच्या दिशेने उत्तरेकडे हालचाल केल्यास मान्सूनच्या आगमनास विलंब होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
केरळच्या जवळील दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने केरळमध्ये 31 मे च्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता असून राज्यात 24 मेपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.