>> काँग्रेसला अंधारात ठेवत आपची पत्रकार परिषदेत घोषणा
>> आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस लोकसभा निवडणूक लढणार
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने काल पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत अचानक एक मोठा निर्णय जाहीर केला. पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस हे इंडिया आघाडीचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असल्याचे आम आदमी पक्षाने काल जाहीर केले. त्यामुळे काँग्रेससह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
काल पत्रकार परिषदेत बोलताना आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. लोकसभा निवडणूक जवळ आली असून, त्याची तारीख कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते. प्रचारासाठी व लोकांशी संपर्क करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळायला हवा यासाठी आम्ही आमचे स्वच्छ चारित्र्याचे एक नेते व पक्षाचे राज्यातील आमदार व्हेन्झी व्हिएगस यांचे नाव दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. काँग्रेस पक्षानेही त्यांच्या नावाला अनुमती द्यावी व ते ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार असल्याचे जाहीर करावे, अशी पक्षाची मागणी असल्याचे पालेकर यांनी सांगितले. महिनाभरापूर्वी इंडिया आघाडीची राज्यात बैठक झाली होती, तेव्हापासून आम्ही पुढील बैठकीच्या प्रतीक्षेत आहोत; पण केंद्रीय नेते व्यस्त असल्याने ही बैठक होत नाही हे दुर्दैवी असल्याचे पालेकर म्हणाले.
भ्रष्टाचारी भाजप पक्षाचा पराभव करण्यासाठी वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने आणखी विलंब करू नये व व्हेंन्झी व्हिएगस यांचा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून स्वीकार करावा, अशी मागणी देखील पालेकर यांनी केली.
‘आप’ला दावा करताच येणार नाही : पाटकर
मागच्या निवडणुकीत दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या जागेवर आम आदमी पक्ष आपला दावा खरे म्हणजे करूच शकत नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले. केंद्रातील इंडिया आघाडीचे नेतेच याविषयीचा काय तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
उमेदवाराबाबतचा गोंधळ लवकरच दूर होईल : चोडणकर
इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. त्यामुळे आप इंडिया आघाडीबरोबर राहील, याचा आम्हाला विश्वास आहे. दक्षिणेतील उमेदवाराविषयी गोंधळ का झाला हे लवकरच स्पष्ट होऊन तो दूर होईल, अशी प्रतिक्रिया गिरीश चोडणकर यांनी दिली.
काँग्रेसमधून आश्चर्य व्यक्त
आम आदमी पक्षाने काल अचानक आपल्या पक्षाचे एक आमदार व्हेन्झी व्हिएगस यांची दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार म्हणून जी घोषणा केली आहे, त्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. इंडिया आघाडीच्या केंद्रीय नेत्यांमध्ये जागा वाटपासंबंधी चर्चा चालू आहे. असे असताना आपचे गोव्यातील स्थानिक नेते परस्पर कसा काय उमेदवार जाहीर करू शकतात, असा सवाल वरील द्वयींनी उपस्थित केला.